नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. शाळा-महाविद्यालये पूर्वपदावर आल्यानंतर तसेच वर्ग नियमित भरू लागल्यानंतर पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना त्यांची सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने नाशिक फर्स्ट-आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्कूल बसचालकांना धडे देण्यात आले आहेत.
शहराला वाहतूक शिस्त लागावी तसेच नागरिकांना चांगले वाहतुकीचे संस्कार मिळावे, यासाठी नाशिक फर्स्टतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून मे महिन्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांसाठी मुलांची सुरक्षितता, अपघातविरहित वाहतूक याबाबत सर्वंकष प्रबोधनपर उजळणी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), नाशिक व नाशिक फर्स्ट यांच्यामार्फत ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीरप्रकृती आणि मनःस्वास्थ्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
नाशिक जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांचे स्कूलबस/खासगी स्कूल व्हॅनचालकांना दोन तासांचे उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन बंधनकारक करण्यात आले होते. वाहनचालकांची अनुज्ञप्ती नूतनीकरण करणे तसेच वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण करताना सदर उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आल्याने प्रशिक्षणार्थींची संख्याही लक्षणीय होती. गेल्या महिनाभरात एक हजारांपेक्षा जास्त चालकांनी या प्रशिक्षण वर्गाला हजेरी लावली होती. उर्वरित चालकांसाठी जून महिन्यातही प्रशिक्षण वर्गाचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात २,३४८ स्कूल बसचालक
महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थ्यांचे सुरक्षित वाहतूक करण्याच्या दृष्टीने स्कूलबस अधिनियम २०११ नुसार नियमावली केली आहे. नाशिक शहर व कार्यालयाचे कार्यक्षेत्रामध्ये सुमारे २ हजार ३४८ स्कूलबस वाहनांना विद्यार्थी वाहतुकीसाठी परवाने जारी करण्यात आलेले असून, दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे चालकांना सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
हेही वाचा :