उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शहरात अफवा, अलर्ट, जमाव अन् चोप

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या नाशिकमध्ये मुले पळविणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवांचे चांगलेच पेव फुटले आहे. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारच्या अफवांमधून दोन चादर विक्रेत्यांना नाशिककरांनी चोप दिला होता. शुक्रवारी आणखी तिघांना याच संशयावरून नाशिककरांनी बेदम मारहाण केली. नाशिककर अलर्ट असल्याचे दाखवून देत असले, तरी कायदा हातात घेत असल्याने, पोलिसांसमोरील आव्हान वाढले आहे.

लहान मुलांना पळवून नेणार्‍या टोळीची अफवा सोशल मीडियावर वार्‍यासारखी पसरल्याने प्रत्येकजण अज्ञात व्यक्तीकडे संशयाच्या नजरेतून बघत आहे. गंजमाळ परिसरात शुक्रवारी याच संशयातून दोघांना नाशिककरांनी बेदम मारहाण केली. गंजमाळ येथील पंचशीलनगर परिसरात औरंगाबाद येथील रहिवासी साहिल लक्ष्मी कुंटे व प्रभात लक्ष्मी कुंटे हे दोघे चोरीच्या हेतूने फिरत होते. त्यांनी संजय रघुनाथ येवले (45, रा. इंदिरानगर सिटी गार्डनशेजारी) यांना त्यांच्या चारचाकीतून खाली काहीतरी पडत असल्याचे सांगितले. मात्र, येवले यांना त्यांचा संशय आला. त्यांनी गाडीच्या काचा बंद केल्या व गाडीच्या मागे जाऊन पाहिले. तेव्हा त्यांच्या चारचाकीच्या नंबरप्लेटवर लाल रंग असल्याचे त्यांना आढळून आले. त्याचबरोबर एकजण त्यांच्या कारमधील पिशवी चोरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच 'चोर चोर' असा आरडाओरड केला. त्यामुळे बिथरलेल्या दोघांनी तेथून पळ काढला. त्यानंतर दोघेही पंचशीलनगर येथे खेळणार्‍या मुलांजवळ जाऊन बसले. मात्र, हे दोघे लहान मुलांना पळवून नेणार्‍या टोळीचेच असल्याचा गैरसमज झाल्याने, परिसरातील नागरिकांनी त्यांना बेदम चोप दिला. यानंतर भद्रकाली पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी वेळीच धाव घेऊन दोघांना ताब्यात घेतले. दुसर्‍या एका घटनेत वडाळा गावातील गणेशनगरसमोरील रस्त्यावर मोबाइलवर शूटिंग करणार्‍या एकाची नागरिकांनी मुले पळविणारा म्हणून धरपकड केली. शुक्रवारी (दि.23) सकाळी 10.30 च्या सुमारास ही घटना समोर आली. हा इसम त्याच्या मोबाइलवर शूटिंग करीत होता. नागरिकांना त्याचा संशय आला. त्यानंतर त्याची धरपकड करून त्याची विचारपूस करण्यात आली. इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास वांजळे, लक्ष्मण बोराडे, जावेद खान, सागर परदेशी यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधिताला ताब्यात घेतले. त्याचबरोबर म्हसरूळ येथील प्रभातनगर भागात राहणार्‍या मुलीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. या सर्व घटना विचारात घेता नाशिकमध्ये अफवांचे पेव फुटले आहे.

पोलिसांचे आवाहन
शहरात अफवांचे पेव फुटले असून, नागरिकच भीती अन् दक्षतेपोटी कायदा हातात घेऊ लागल्याने पोलिसांची चिंता वाढली आहे. अशात नाशिककरांनी कायदा हातात न घेता पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT