उत्तर महाराष्ट्र

नाशिक : वादग्रस्त फायरबॉलची मनपाकडून पुन्हा खरेदी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दोन वर्षांपूर्वी मनपा प्रशासनाने मागील दाराने तब्बल 89 लाखांच्या फायरबॉलची खरेदी केली होती. या खरेदीला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला होता. त्यानंतर आता पुन्हा हेच फायरबॉल खरेदी करण्यात येणार आहेत. मनपाच्या रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या नावाखाली एक फायरबॉल 7,080 रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे. याच फायरबॉलची बाजारात किंमत 1200 ते 1500 रुपये आहे. महापालिका तब्बल 18 लाख 19 हजाराचे फायरबॉल खरेदी करणार आहे.

महापालिकेत दोन वर्षांपूर्वी अशासकीय ठरावाच्या आधारे 89 लाख रुपयांचे 1,391 फायरबॉल खरेदी करण्यात आले होते. फायरबॉलच्या बाजारभावाच्या किमती विचारात न घेताच ही खरेदी झाली होती. बाजारात याप्रकारचे फायरबॉल अवघ्या दीड हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. असे असताना महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविताना एका फायरबॉलची किंमत 6 हजार 388 रुपये गृहीत धरली. काही अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगनमताने हा प्रकार घडला होता. प्रकार समोर आल्यानंतर निविदा स्थगितीचा देखावा उभा करण्यात आला. परंतु, मागील दाराने फायरबॉलची खरेदी करण्यात आली. फायरबॉलची आग विझवण्याच्या दृष्टीने उपयुक्ततादेखील तपासण्यात आली नाही. आता पुन्हा तोच कित्ता प्रशासकीय राजवटीत प्रशासनाकडून रुग्णालये, प्रसूतिगृहांतील अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी 257 नग फायरबॉल खरेदीचा प्रस्ताव महासभेवर मंजूरही करण्यात आला आहे. फायरबॉल खरेदीसंदर्भात अग्निशमन विभागाने महापालिकेच्या रुग्णालये, प्रसूतिगृहांच्या फायर ऑडिटचे कारण पुढे केले आहे. फायर ऑडिट केल्यानंतर फायरबॉल खरेदीची गरज असल्याचे नमूद करत 18 लाख 19 हजार रुपयांच्या फायरबॉल खरेदीचा प्रस्ताव महासभेवर सादर करण्यात आला होता. शासनाच्या जी.एम. पोर्टलवर नमूद दरानुसार फायरबॉल खरेदीसाठी 7080 रुपये प्रतिनग दर निश्चित करण्यात आल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात येते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT