उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मालेगावात एका एकरात तीस टन टरबुजाचे विक्रमी उत्पादन

अंजली राऊत

नाशिक (मालेगाव ) : पुढारी वृत्तसेवा : टेहरे येथील प्रयोगशील शेतकरी विजय शेवाळे यांनी एक एकर क्षेत्रात 30 टन टरबुजाचे विक्रमी उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.

बाळासाहेब शेवाळे व त्यांचा मुलगा विजय यांनी 10 फेब्रुवारी रोजी सिंबा या वाणाच्या सात हजार रोपांची लागवड केली होती. गादीवाफे, मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनाचा वापर केला गेला. जमिनीची मशागत ते पीक काढणीपर्यंत 50 हजार रुपयांचा खर्च पीक व्यवस्थापनावर झाला. या उत्पादनातून कमीत कमी अडीच लाखांपेक्षा जास्त नफा मिळण्याची अपेक्षा शेवाळे यांनी व्यक्त केली आहे. किमान दोन किलो ते जास्तीत जास्त सात किलो वजनाचे फळ तयार झाल्याने उत्पन्नात भरघोस वाढ झाली.

पीक काढणी कार्यक्रमात कंपनी प्रतिनिधींनी उपस्थित शेतकर्‍यांना टरबूज पिकाच्या वाणाची निवड, लागवडीचा कालावधी, लागवड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, रोगावर कीटकनाशक, बुरशीनाशक फवारणी कोणती करावी, याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी शेवाळे हे सात वर्षांपासून टरबुजाचे पीक घेत आहेत. मागील दोन वर्षांत भरघोस उत्पादन हाती येऊनही कोरोनामुळे आर्थिक फटका बसला होता. यावर्षी मात्र त्यांना मोठ्या आशा वाटत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मालेगाव तालुक्यात 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमान असल्याने, उन्हाळ्यात शरीरासाठी अत्यंत पोषक असणार्‍या टरबूज खाणार्‍यांची संख्या वाढल्याने मागणीवर सकारात्मक परिणाम होऊन समाधानकारक पैसे मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT