उत्तर महाराष्ट्र

नाशिक : राष्ट्रीय छात्र सेनेचे ‘नदी वाचवा’ अभियान

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 22) महानगरपालिका व राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने 'नदी वाचवा' अभियान राबविण्यात आले. मनपा कर्मचार्‍यांसह स्वयंसेवकांनी श्रमदान करून नंदिनी नदी स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला. या अभियानाद्वारे अंदाजे 2.5 टन कचरा संकलित करून घंटागाडी वाहनांद्वारे घनकचरा प्रक्रिया केंद्रात पाठविण्यात आला.

मनपा आयुक्त रमेश पवार, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) 7 महाराष्ट्र बटालियन कमांडिंग ऑफिसर अलोककुमार सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत 'नदी वाचवा' अभियान पार पडले. शहरातील विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्था (5), राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स (250), मनपा कर्मचारी (150) तसेच मलेरिया विभागाचे 20 कर्मचारी आदींनी श्रमदान केले. शहरातील गोदावरी, कपिला, नंदिनी यांसारख्या नद्या स्वच्छ केल्याने शहराच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास आयुक्त पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे स्वच्छता जागृतीपर संदेश सादर करण्यात आले. त्यामध्ये ईश्वरी सूर्यवंशी, गोकुळ चव्हाण यांनी व सायक्लोथॉन डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी स्वच्छता जनजागृतीपर सादरीकरण केले. विद्या सांगळे यांनी कथ्थकद्वारे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांसह स्वच्छतादूत चंदू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, पूर्व विभागाचे स्वच्छता विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ, नितीन धामणे, विद्युत विभागाचे उदय धर्माधिकारी, बांधकाम विभागाचे शिवकुमार वंजारी, संतोष मुंडे आदी उपस्थित होते.

असे असणार अभियान…
दि. 25 तेे 27 एप्रिलपर्यंत नदी वाचवा अभियानाअंतर्गत मुंबई नाका व उंटवाडी नंदिनी नदीकिनारा या ठिकाणी श्रमदान करण्यात येणार आहे. या अभियानात नाशिक शहरातील जास्तीत जास्त नागरिक व सामाजिक, स्वयंसेवी संस्था यांनी सहभागी होण्याचे आवाहन मनपा आयुक्त रमेश पवार यांनी केलेे आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT