उत्तर महाराष्ट्र

नाशिक : उद्योजकांच्या समस्या; ‘झूम’ची प्रतीक्षा

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उद्योजकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून जिल्हा उद्योग मित्रची (झूम) बैठकच होऊ शकली नसल्याने, उद्योगांसमोरील प्रश्न वाढले आहेत. त्यामुळे ही बैठक तातडीने घेण्यात यावी यावरून उद्योजक आक्रमक झाले असून, आयमच्या पदाधिकार्‍यांनी नुकतेच जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक शैलेश राजपूत यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.

जिल्ह्यातील उद्योगांचे प्रश्न वेळेत सोडविले जावे. याकरिता जिल्हा उद्योग मित्रची बैठक नियमित घेणे गरजेचे आहे. त्याबाबतचे तसे संकेतही आहेत. मात्र, अशातही गेल्या साडेतीन वर्षांपासून ही बैठकच होऊ शकले नसल्याने, जिल्ह्यातील उद्योगाचे प्रश्न वाढले आहेत. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, समन्वयक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक असतात. उद्योगांशी निगडित सर्वच यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित असतात. बैठकीत उद्योजकांच्या संघटनांनी मांडलेल्या समस्या, प्रश्न येथे सोडविले जातात. त्यामुळे या बैठकीला अनन्यसाधारण महत्त्व असून, उद्योग विकासाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. मात्र, गेल्या साडेतीन वर्षांपासून बैठकच झाली नसल्याने, उद्योजकांमध्ये आता रोष व्यक्त केला जात आहे. अंबड व सातपूर येथील औद्योगिक वसाहतींमधील सुरक्षाव्यवस्था, वसाहतीतील प्रमुख रस्ते, तसेच अंतर्गत रस्ते, पथदीप, नालेसफाई, पाण्याची कमतरता आदी प्रश्नांनी उद्योजक हैराण झालेले असून, त्याबाबत तातडीने मार्ग काढण्यास झूम बैठक तातडीने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. याबाबत आता आयमासह इतर उद्योग संघटना आक्रमक झाल्या असून, प्रशासनाने तत्काळ बैठकीचे आयोजन करण्याबाबत हालचाली कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT