नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमध्ये शनिवारी झालेल्या बस अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्ते सुरक्षेबाबत संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून कामे करावीत. जेणेकरून अपघात होणार नाहीत, त्यादृष्टीने आवश्यक त्या शाश्वत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (दि.10) जिल्ह्यातील विविध रस्ते, महामार्गावरील अपघात, ब्लॅक स्पॉट व रस्ते सुरक्षिततेबाबत ना. भुसे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रशेखर पुलकुंडवार, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, बी. एस. साळुंखे, प्रशांत सोनवणे, प्रदीप शिंदे, नितीन पालवे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. ना. भुसे म्हणाले की, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शाश्वत उपाययोजना करताना वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने अवजड वाहनांसाठीच्या नियमांबाबत टोलनाक्यांवर जनजागृती करावी. त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार्या प्रत्येक वाहनचालकाला रस्त्याच्या लेनच्या शिस्तीचे पालन करणे अनिवार्य करावे. त्यासाठी स्वयंसेवी संस्था तसेच यंत्रणांमधील मनुष्यबळ समांतररीत्या टोलनाक्यावर देताना साधारणत: एक महिनाच्या कालावधीसाठी हा उपक्रम मोहीम स्तरावर राबविण्याच्या सूचना ना. भुसे यांनी केल्या. रस्त्यावर लावलेले सिग्नल लाल आहे किंवा कसे लांबून दिसण्यासाठी मुंबई, पुणे येथे ज्याप्रमाणे संपूर्ण सिग्नलचा स्तंभ लाल रंगात चकाकतो त्याप्रमाणे काही नियोजन करता येईल का? त्यासाठी विचार करावा, असे भुसे यांनी सांगितले. बैठकीत जयंत नाईकनवरे, सचिन पाटील, प्रदीप शिंदे आदींनी रस्ता सुरक्षा, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, ब्लॅक स्पॉटविषयी कामांचे सादरीकरण केले. दरम्यान, जिल्ह्यातील रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. त्याचप्रमाणे आवश्यक तेथे व नियमांनुसार थर्मोप्लास्टिक पेंट, रम्बलर आणि अनुषंगिक बाबींची पूर्तता तातडीने करावी. त्यासाठी प्रादेशिक परिवहन, सार्वजनिक बांधकाम व महानगरपालिका यांनी एकत्रितपणे काम करावे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेदेखील रस्त्यांची कामे चोखपणे करून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे, अशा सूचना ना. भुसे यांनी बैठकीत केल्या.
वारसांना मदतनिधीचे वितरण :
जिल्ह्यातील कर्तव्य बजावतांना कोरोनाने मृत्यू झालेल्या चार पोलिसपाटलांच्या वारसांना बैठकीच्या प्रारंभी ना. भुसे यांच्या हस्ते प्रत्येकी 50 लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. त्यामध्ये लक्ष्मण पूर, झापवाडी (ता. सिन्नर) येथील दिवंगत सुयोग शिंदे; पुनदनगर (ता. कळवण) येथील पोलिसपाटील पंढरीनाथ चव्हाण, शिवडेचे (ता. सिन्नर), पांडुरंग कवटे आणि चेहडीचे (ता.निफाड) पोलिसपाटील केशव रुमणे या चौघांच्या वारसांना धनादेशाचे वितरण करण्यात आले.