नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण पोलिस दलातील १ हजार ९१ पोलिस अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार विविध आस्थापनांमधील पाेलिसांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या आहेत. पोलिस शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षकांच्या या बदल्या झाल्या असून, या प्रक्रियेमुळे काहींना आनंद, तर काहींना दु:ख झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
या बदल्यांमध्ये १६ हवालदार, १३ पाेलिस शिपाई, १३ सहायक उपनिरीक्षक, १८ चालक व ५ पाेलिस नाईकांना मुदतवाढ दिली. तसेच १०० सहायक पाेलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या असून, २८९ हवालदारांचाही बदलीत समावेश आहे. यासह २५७ पाेलिस नाईक आणि २७१ पाेलिस शिपायांची बदली झाली आहे. त्याचप्रमाणे ७२ चालक अंमलदारांची बदली झाली आहे. या बदल्यामंध्ये १५३ महिला पोलिसांच्याही बदल्या झाल्या आहेत. अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पाेलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या पाेलिसांच्या बदल्यांबाबत चर्चा सुरू होती.
पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी बदल्यांचे आदेश देत अनेकांना अनपेक्षित धक्का दिला. बदल्यांसाठी अनेकांनी घराजवळील पाेलिस ठाणे मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र नुकत्याच झालेल्या बदल्यांमध्ये १०२ अंमलदारांच्याच विनंतीनुसार बदल्या केल्या आहेत, तर अनेकांना आस्थापनांमधून पोलिस ठाण्यात बदली दिली आहे. बदल्यांमध्ये जिल्हा विशेष शाखा, पाेलिस मुख्यालय, नियंत्रण कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, श्वान पथक, महिला सुरक्षा, सीसीटीएनएस, सायबर, आरसीपी, एटीएस व वाहतूक शाखेतील पाेलिसांचा समावेश आहे.
हेही वाचा :