उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

अंजली राऊत

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा देवळा पोलिसांनी तक्रार दाखल होताच चोवीस तासांच्या आत शोध घेत त्याला सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले. देवळा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, मुलाच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

देवळा तालुक्यातील वासोळपाडे (फुलेनगर) येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगा सोमवारी (दि. 5) सकाळी साडेअकराच्या दरम्यान घरातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. आई-वडील व नातेवाइकांनी परिसरात चार-पाच दिवस शोध घेतला. मात्र, मुलगा सापडत नसल्याने रविवार (दि.11) दुपारी मुलाच्या पालकांनी देवळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व त्यांच्या पथकाने मुलाची माहिती व दिलेल्या वर्णनावरून मुलाच्या शोधासाठी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. विविध ठिकाणी विचारपूस करत मुलाचा शोध सुरू झाला. रात्री दहाच्या सुमारास या मुलाने त्याच्याजवळील मोबाइल चालू केला. लागलीच शिरसाठ यांनी त्याचे लोकेशन घेऊन त्यांचे मित्र पोलिस समाधान शिंदे यांना माहिती दिली. समाधान शिंदे कामावरून घरी येऊन जेवणाला बसले होते. मात्र, मुलगा अल्पवयीन असल्याने त्यांनी जेवणाचे ताट बाजूला करून भर पावसात मुलाचा शोध सुरू केला. अन् अखेर पाऊस सुरू असल्याने नाशिक शहरातील गंगापूर रोड या परिसरातील एका दुकानाच्या बाहेर कोपर्‍यात बसलेला आढळून आला. त्याच्याकडे विचारपूस केली असता बेपत्ता मुलगा हाच असल्याची खात्री पटविण्यासाठी पोलिस समाधान शिंदे यांनी त्याचे छायाचित्र घेत सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांना पाठवले. मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या वर्णनाचा मुलगा हाच असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन देवळा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे आणि सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी त्याचे योग्य समुपदेशन करून आई-वडिलांच्या ताब्यात दिले. यावेळी मुलगा सुखरूप परतल्याने मुलाच्या आई-वडिलांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. अनेकदा मिसिंग प्रकरणात पोलिसांकडून वेट अण्ड वॉचची भूमिका घेतली जात असल्याचे दिसते. मात्र, देवळा पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत मुलांचा शोध घेतल्याने पोलिसांच्या कामगिरीचे तालुक्यात कौतुक होत आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT