नाशिक (पंचवटी): पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने पंंचवटी परिसरातील अनेक भागांत अचानकपणे अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने विक्रेत्यांची धावपळ उडाली. हातगाड्या, भाजीपाल्यासह अन्य माल जप्त केल्याने विक्रेते आणि मनपा कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले.
महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व उपआयुक्त करुणा डहाळे यांच्या आदेशानुसार पंचवटी परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून अमृतधाम, विडी कामगारनगर व नीलगिरी बाग परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीविक्रेते आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला लागत असल्याने दररोज सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. तसेच या अतिक्रमणाविरोधात स्थानिक नागरिकांकडून वेळोवेळी महापालिकेला तक्रारीदेखील केल्या गेल्या होत्या. अखेर महापालिकेकडून बुधवारी (दि. १०) दिवसभर ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. या मोहिमेत रस्त्यावर बसलेल्या भाजीविक्रेत्यांचे साहित्य तसेच अनेक हातगाड्या उचलण्यात आल्या असून, त्या महापालिकेच्या भांडारात ठेवण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमुळे परिसरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. पालिकेच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. ही मोहीम पालिकेच्या सहाही विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली असून, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे रतन गायधनी, प्रवीण बागूल, जीवन ठाकरे, प्रदीप जाधव, उमेश खैरे, भगवान सूर्यवंशी, प्रभाकर अभंग, नंदकिशोर खांडरे यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी कारवाईसाठी उपस्थित होते.
लॉन्सचालकांची बेपर्वाई
सध्या लग्नसराई असल्याने छत्रपती संभाजीनगर रोडवरील मंगल कार्यालये व लॉन्समध्ये मोठ्या प्रमाणात लग्नांची धूम सुरू आहे. लग्नासाठी आलेली वाहने आणि नवरदेवाच्या वरातींमुळे या मार्गावर खास करून सायंकाळच्या सुमारास वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मनपाकडून एकीकडे लहान मोठ्या विक्रेत्यांवर कारवाई होत असताना दुसरीकडे मंगल कार्यालये व लाॅन्समालकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही.
हेही वाचा :