नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा
पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पादन यासाठी लागणारा खर्च आणि मिळणारे बाजारभाव हे समीकरण तोट्याचे होत चालले आहे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची सुपिकता आणि जमिनीचा पोत दिवसेंदिवस बिघडत आहे. आधुनिक पद्धतीने सेंद्रिय रेशीम शेतीतून कमी श्रमात कोणत्याही हंगामात रोजगार आणि उत्पन्न मिळू शकते हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामधील कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी (नाना) जाधव यांनी दाखवून दिले.
सखाहरी जाधव यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने दीड एकर शेतीत रेशीम लागवड करण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. पिकवलेला रेशीमचा पाला अथवा तुती हा अळ्यांचे खाद्य असून, त्यांनी यासाठी वीस बाय पन्नासचे शेड उभे केले आहे. साधारण तीस दिवसांत अळ्या तयार होतात. त्यांची रेशीम जालना येथे विक्रीसाठी जात आहे. तुती लागवडीचे सहा महिन्यांत पहिले पीक येते. रेशीमच्या अळ्यांना बाजारात 500 ते सहाशे रुपये किलोप्रमाणे बाजारभाव मिळतो.
तुती लागवडीसाठी जीवामृत, शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर करून उत्पादन मिळाले. जाधव हे महाराष्ट्रात शेतकर्यांनादेखील मार्गदर्शन देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत असतात. बेलगाव कुर्हेचे आदर्श शिक्षक विष्णू बोराडे यांनी रेशीम शेती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केल्याचे जाधव सांगतात. महाराष्ट्र रेशीम संचालनालयचे सहसंचालक दिलीप हाके, महेंद्र ढवळे, जिल्हा रेशीम तांत्रिक अधिकारी सारंग सोरते हे वेळोवेळी मार्गदर्शन करतात, असेही ते म्हणाले.
आदर्श शेतकरी, रेशीम श्री पुरस्कार..
दर महिन्याला त्यांना साधारणपणे एक लाख 80 हजार उत्पन्न मिळत आहे. यावर्षी रेशीमला चांगला भाव असल्याने वर्षाला 8 ते 9 लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा रेशीम संचानालयतर्फे 'रेशीम श्री पुरस्कार'देखील नाना जाधव यांना मिळाला आहे. नवीन प्रयोगात त्यांची पत्नी तुळसाबाई, वडील, मुलेदेखील मदत करतात. त्यांचा प्रयोग पाहून तालुक्यातील शेतकरीदेखील सरसावले आहेत. विशेष म्हणजे या शेतीत कीटकनाशके फवारण्याची देखील गरज भासत नाही.
रेशीम उद्योगामुळे आर्थिक उत्पन्न व मानसन्मान देखील मिळाला. यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदाने व्यवसायासाठी मदत करतात. मोठा मुलगा राहुल याने कोल्हापूर विद्यापीठात सेरिकल्चर डिप्लोमा केला. त्याचाही फायदा रेशीम उद्योग करताना होत आहे. शासनाच्या नियोजन आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गर्शन घेत सहा वर्षांपासून रेशीम शेती करीत आहे.
– सखाहरी ऊर्फ नाना जाधव,
रेशीम उत्पादक शेतकरी, कृष्णनगर