उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महापालिकेच्या नऊ शाळा बनल्या स्मार्ट

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

मनपा शिक्षण विभागामार्फत स्मार्ट स्कूल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असून, डीमार्ट फाउंडेशनच्या सहयोगाने मनपाच्या नऊ शाळांसाठी संगणक कक्ष आणि वाचनालय कक्ष विकसित करून डिजिटल लर्निंग प्रोग्राम व रीडिंग प्रोग्राम उपक्रम राबविण्यात येत आहे.

नाशिक महापालिकेची शाळा क्र. २७, २८ आणि सातपूर कॉलनीतील माध्यमिक शाळेत दोन दिवसीय स्मार्ट गर्ल हा उपक्रम नुकताच राबविण्यात आला. उपक्रमाचा समारोप मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी डीमार्ट फाउंडेशनने विकसित केलेल्या संगणक, वाचनालय कक्ष तसेच युवा अनस्टॉपेबलमार्फत विकसित करण्यात आलेल्या स्मार्ट क्लास रूमचे उद्घाटन आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. भारतीय जैन संघटना, नाशिक यांच्यातर्फे ३ आणि ४ मार्च रोजी किशोरवयीन मुलींसाठी स्मार्ट गर्ल हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी आयुक्तांनी विद्यार्थिनी, पालकांसोबत संवाद साधला. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर साखला यांनी उपक्रमाची माहिती दिली. स्मार्ट गर्ल ट्रेनर्स राजेंद्र भुतडा, सुषमा गांधी आणि पारूल दिवाणी यांनी मार्गदर्शन केले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे राज्य सचिव दीपक चोपडा, राज्य सदस्य यतिश डुंगरवाल, नाशिक विभागीय अध्यक्ष ललित सुराणा, नाशिक सिटी चॅप्टर अध्यक्ष परेश बागरेचा, सचिव सिद्धार्थ शाह, खजिनदार नयन बुरड, उपाध्यक्ष संतोष मुथा, प्रणय संचेती, पीयूष बोरा, लोकेश कटारिया, शाळा केंद्रप्रमुख नितीन देशमुख, मुख्याध्यापिका छाया गोसावी, भास्कर कुलधर, सुरेश खांडबहाले यांचे सहकार्य लाभले.

चार हजार विद्यार्थ्यांना लाभ

नऊ शाळांमधील प्रत्येक शाळेत २१ संगणक, सुमारे २००० पुस्तके, फर्निचर, बोलक्या भिंती आणि इमारतीच्या दर्शनीय भागाचे रंगकाम करण्यात आले आहे. एकूण १७ तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. उपक्रम पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. याचा फायदा नऊ शाळांमधील सुमारे ४००० विद्यार्थ्यांना होणार आहे. यावेळी डीमार्ट फाउंडेशनच्या पर्यवेक्षक प्राची माळी, स्मार्ट स्कूल प्रकल्प सल्लागार कंपनी पॅलेडियम कन्सल्टिंग इंडियाचे टीम सदस्य अंशुमन कुमार, हर्षद वाघ यांनी आयुक्तांना उपक्रमाची माहिती दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT