उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘नासाका’ला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल : गुरुमाउली मोरे

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याची खा. हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने अवघ्या महिनाभरात दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात आले. ही अभिमानास्पद बाब आहे. सद्गुरू श्री संत जनार्दन स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक सहकारी साखर कारखान्याची भूमी अतिशय पवित्र असून, खा. गोडसे या योग्य व्यक्तीच्या माध्यमातून हा कारखाना पुन्हा गतवैभव प्राप्त करील, असे प्रतिपादन गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी बॉयलर अग्निप्रदीपनाप्रसंगी केले.

महिनाभरापूर्वी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नासाकाची सूत्रे खा. गोडसे यांनी दीपक बिल्डर अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपनीच्या माध्यमातून हाती घेतल्यानंतर अवघ्या महिनाभरात मशीनरी दुरुस्ती केली. कार्यक्षेत्रात 400 एकरहून अधिक ऊस शिल्लक असल्याने तो तोडण्याकामी शेतकर्‍यांची आग्रही भूमिका असल्याने चाचणी गळीत हंगाम घेण्याचा संकल्प केला. त्या द़ृष्टीने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर गुरुमाउली मोरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. यावेळी गुरुमाउलींनी उपस्थित शेतकर्‍यांना ऊस लागवडीचे व कामगारांना प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. यावेळी दीपक चंदे, अनिता गोडसे, अजिंक्य गोडसे, भक्ती गोडसे, सागर गोडसे, भाग्यश्री गोडसे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक शैलेश पिंगळे, प्राधिकृत अधिकारी दीपक पाटील, मतीन बेग कारखान्याचे कार्यकारी संचालक एच. एन. पाटील, जनरल मॅनेजर अनंत निकम, शेतकी अधिकारी जे. जी. जगताप, माजी चेअरमन तानाजीराव गायधनी, संचालक राजाराम धनवटे, लीलाबाई गायधनी, नवनाथ गायधनी, पळसेच्या सरपंच सुरेखा गायधनी, आर. डी. धोंगडे, कामगार युनियन अध्यक्ष विष्णुपंत गायखे आदींसह सभासद उपस्थित होते.

कारखाना कार्यक्षेत्रात सुमारे 400 एकर उसाची तोडणी होणे बाकी आहे. मशीनरी दुरुस्तीचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असले, तरी स्टीम व हायड्रोलिकची चाचणी होणे बाकी आहे. या चाचण्या यशस्वी होताच लवकरच कारखान्याचा चाचणी गळीत हंगाम घेतला जाणार आहे. – हेमंत गोडसे, खासदार

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT