उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महापालिकेच्या पुष्पोत्सवाचे आज उद्घाटन

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेच्या उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी व नाशिक सिटिझन फोरम यांच्या सहकार्याने मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन येथे दि. २४ ते २६ मार्चला आयोजित पुष्पोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २४) अभिनेत्री अर्चना निपाणकर यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी 'नृत्य रंगवेध' हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, पुष्पोत्सवाच्या पूर्वसंध्येला नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या सहकार्याने पर्यावरणपूरक पुष्प सायकल रॅली काढण्यात आली होती.

पुष्पोत्सव आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ४० सायकलस्वारांनी रॅलीत सहभाग घेतला होता. शहरातील फुलबाजार येथील गाडगे महाराज पुलाजवळ सायकलस्वार जमले होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि उद्यान विभाग उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. आयुक्त स्वतः सायकलवर रॅलीत सहभागी झाले होते. 'स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, फुलांचे नाशिक' असा नारा देत सायकल रॅलीची सांगता मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे झाली.

सर्व सायकलस्वारांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनला राजीव गांधी भवनच्या भिंतीवर पहिले पुष्प गुंफण्याचा मान मिळाला. संस्थेचे अध्यक्ष किशोर माने, उपाध्यक्ष जगन्नाथ पवार, सचिव अविनाश लोखंडे तसेच संस्थेचे सुरेश डोंगरे, चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, डॉ. मनीषा रौंदळ, एस. पी. आहेर, डॉ. नितीन रौंदळ, नरेश काळे, रामदास सोनवणे, अनुराधा नडे, दिलीप देवांग, मेघा सोनजे, अश्विनी कोंडेकर, कारभारी भोर, अरविंद निकुंभ, मनोज गायधनी, मनोज जाधव आदींचा सन्मान आयुक्तांनी केला. रॅलीचे नियोजन साधना दुसाने, अमित घुगे यांनी केले होते. सायकल रॅलीची संकल्पना योगेश कमोद यांनी मांडली होती. सहायक कनिष्ठ अभियंता वसंत ढुमसे, उद्यान निरीक्षक उद्धव मोगल, किरण बोडके, नानासाहेब पठाडे, प्रशांत परब, वैभव वेताळे, श्याम कमोद उपस्थित होते.

संगीत, नृत्याची मैफल

शनिवारी (दि. २५) 'स्वर सुगंध' हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी अभिनेता चिन्मय उद‌्गीरकर, किरण भालेराव उपस्थित राहणार आहेत. २६ मार्चला विजेत्यांना ट्रॉफीजचे वितरण हास्यअभिनेता भारत गणेशपुरे यांच्या हस्ते होणार आहे. महोत्सव दि. २४ ते २६ मार्च दरम्यान सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांसाठी खुला असणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT