उत्तर महाराष्ट्र

नाशिक : निराधारांना महापालिकेचा आधार

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरासह उपनगरातील निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांकरिता तसेच अनाथ, निराश्रित मुलांना महापालिकेने आर्थित मदतीचा आधार दिला आहे. या निराधारांसाठी महापालिकेच्या समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागाने मागील तीन वर्षांत विधवा, घटस्फोटित महिलांच्या 317 मुलांना तसेच निराधार मुलांना महापालिकेने तब्बल 30.96 लाखांची शिष्यवृत्ती वितरित करण्यात आली आहे.

सन 2020 पासून मनपाकडून निराधार, विधवा, परित्यक्ता महिलांच्या मुलींच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य करणे, त्यांच्या मुलांना तसेच निराधार मुलांना शिष्यवृत्ती देणे, अनाथ-निराश्रित मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्साहनपर अनुदान देणे तसेच अशा मुलांच्या वार्षिक शैक्षणिक शुल्कासाठी अर्थसहाय्य देणे आदी योजना राबविल्या जात आहेत. योजनेचे पहिले वर्षे योजनेच्या सुसूत्रीकरण आणि अंमलबजावणी प्रक्रियेत गेले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे योजनांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांत तब्बल 317 मुलांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना 30 लाख 96 हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे. तर अनाथ, निराश्रित मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्साहानात्मक अनुदान देण्याच्या योजनेला कागदपत्रांचा अडथळा येत आहे. गेल्या तीन वर्षांत एकाच पालकाला अनुदान प्राप्त होऊ शकले आहे. तर 4 अनाथ, निराश्रित मुलांना वार्षिक शैक्षणिक शुल्क अदा करण्यात आल्याचे उपआयुक्त अर्चना तांबे यांनी सांगितले.

महापालिका हद्दीतील निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांकरिता तसेच अनाथ, निराश्रित मुलांसाठी शासन निर्देशांनुसार महापलिकेच्या समाजकल्याण व महिला बालकल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. लोकांपर्यंत या योजना पोहोचविण्यासाठी जनजागृती केली जाईल.
– अर्चना तांबे, उपआयुक्त

कन्यादानासाठी 38 लाखांचे अर्थसहाय्य..
महापालिकेतर्फे विधवा महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. गेल्या तीन वर्षांत या योजनेचा 38 विधवा महिलांनी लाभ घेतला आहे. त्यांच्या मुलींच्या विवाहाकरिता पालिकेने 38 लाख रुपयांचे अर्थसहाय्य अदा केले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT