उंब्रज : रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी | पुढारी

उंब्रज : रस्त्याच्या कामामुळे वाहतूक कोंडी

उंब्रज : सुरेश सूर्यवंशी

पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर शिवडे व इंदोली फाटा येथे अंडर पास पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र याठिकाणी महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रस्त्यावरून वळविण्यात आल्याने व याठिकाणी विरुद्ध दिशेने ये-जा सुरू असल्याने मसूर फाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने याठिकाणी वाहतूकीची कोंडी होणार नाही, असे योग्य नियोजन व पर्यायी व्यवस्था करणे गरजेची आहे, अशी मागणी ग्रामस्थ व प्रवाशींमधून केली जात आहे.

येथील उत्तर मांड नदीवर महामार्गाच्या पूर्व व पश्चिम बाजूला सुरू असलेल्या सेवा रस्त्यांच्या पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच पुढे मसूर फाटा येथे अंडर पास पुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याने मांड नदी पासून महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रस्त्यावर वळविण्यात आली आहे. मात्र याठिकाणी अरुंद सर्व्हिस रस्ता व मसूर मार्गावरून येणारी लहान मोठी वाहने विरुद्ध दिशेचा वापर करत असल्याने याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. तर कराड दिशेकडून येणारे व मसूर कडे जाणारे प्रवाशी सुद्धा विरुद्ध दिशेने येण्याचा प्रयत्न करीत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी निर्माण होण्याबरोबरच लहान मोठे अपघात होवू लागले आहेत. वास्तविक पाहता महामार्गालगत अनेक गावे असल्याने या गावातील शेतकरी, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना रस्त्याचे काम सुरू असल्याने शंभर मीटर अंतरासाठी सुमारे एक ते दोन कि.मी.चा पल्ला पार करावा लागू नये म्हणून अनेकजण शॉर्टकटचा वापर करीत आहेत. मात्र वाहनधारकांना असा शॉर्टकट जीवावर बेतत असल्याने वाहनधारकांनी सुद्धा योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.

अपघाताचा धोका..

मसूरहून उंब्रजकडे येणारे वाहनधारक हे मसूर फाटा येथून विरुद्ध दिशेचा वापर करीत असल्याचे लक्षात येताच याठिकाणी पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरु केले. मात्र प्रवाशाकडून पुन्हा शॉर्टकटचा वापर करून अपघातास निमंत्रण दिली जात असून जीव धोक्यात घातला जात आहे.

Back to top button