उत्तर महाराष्ट्र

नाशिक : कडक उन्हाळ्यामुळे शहरातही घसा कोरडा, महापालिकेकडून इतके टँकर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
उन्हाच्या तीव्रतेत दिवसागणिक वाढ होत असल्याने केवळ ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरी भागातील नागरिकांचाही घसा कोरडा पडू लागला आहे. पुरेशा दाबाने व नियमितपणे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होत असून, तक्रारींच्या अनुषंगाने महापालिकेने शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे 10 टँकर सुरू केले आहेत.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लि. कंपनीने शहरात अनेक ठिकाणी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले आहेत. हे खोदकाम करताना अनेक ठिकाणी पिण्याच्या पाइपलाइन तुटल्याने पाणीगळती होऊन पाणीपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहराला गंगापूर धरण समूह, मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. 80 टक्के पाणीपुरवठा गंगापूर धरणातून, तर 20 टक्के पाणीपुरवठा मुकणे आणि दारणा समूहाद्वारे केला जातो. महापालिकेने गंगापूर धरण समूहातून चार हजार दशलक्ष घनफूट, मुकणेतून 1,500, तर दारणा धरणातून 100 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण मिळावे, अशी मागणी जलसंपदा विभागाकडे नोंदविली होती.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत झालेल्या पाणी आरक्षण बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शहराला दररोज 525 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात असून, एप्रिल महिन्यात वाढलेल्या उन्हामुळे पाणीपुरवठ्यात वाढ करावी लागली आहे. त्यानुसार मनपाने पाणीपुरवठा 525 दशलक्ष लिटरवरून 541 दशलक्ष लिटरपर्यंत वाढविला आहे. उन्हाच्या तीव—तेत वाढ होत असल्याने पाण्याच्या मागणीतही वाढ होत असून, पाणीपुरवठा पुरेसा होत नसल्याने मनपाकडे तक्रारींच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT