उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘मनरेगा’वर वाढतोय मजुरांचा टक्का, ग्रामीण भागात अर्थचक्र मंदावल्याचा परिणाम

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात एकीकडे उष्णतेची लाट कायम असताना ग्रामीण भागात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवर (मनरेगा) मजुरांचा टक्का वाढतो आहे. जिल्ह्यात मनरेगांतर्गत 2 हजार 318 कामे प्रगतिपथावर आहेत. गेल्या आठवड्यात या कामांवर 15 हजार 919 मजुरांची उपस्थिती होती.

राज्यात उष्णतेचा दाह वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातही पार्‍याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. उन्हामुळे शेतीची कामे ठप्प होत असल्याने ग्रामीण भागाचे अर्थचक्र मंदावले आहे. परिणामी, ग्रामीण भागातील मजुरांची पावले मनरेगांच्या कामांकडे वळता आहेत. मजुरांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक कामांचे नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यात सद्यस्थितीत मनरेगा योजनेंतर्गत 2 हजार 318 कामे सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर 2075, तर यंत्रणास्तरावरील 243 कामांचा समावेश आहे. या दोेन्ही प्रकारांमध्ये घरकुल उभारणीची कामे सुरू आहेत. त्याव्यतिरिक्त रस्ता खडीकरण, वृक्षलागवड, भात खाचर, गोट शेड, मातीनाला बांध, पोल्ट्री व कॅटल शेड तसेच गाळा काढणे आदी प्रकारची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम उपलब्ध होऊन त्यांना रोजगार मिळतो आहे.

मनरेगा ठरतेय फायदेशीर
कोविड-19 चा प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शासनाने निर्बंधमुक्ती घोषित केली. परंतु, मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यामुळे जनता त्रस्त झाली होती. त्यावेळी मजुरांसाठी मनरेगा योजना आधार ठरली. 2021 च्या मेमध्ये मनरेगावर एकाच आठवड्यात तब्बल 41 हजार मजूर उपस्थिती नोंदविण्यात आली होती. सुदैवाने यंदा कोरोना नसला तरी उन्हाचा कडाका अधिक आहे. अशावेळी ग्रामीण मजुरांसाठी मनरेगा योजना हे फायदेशीर ठरते आहे.

कामे प्रगतीपथावर – 2318

ग्रामपंचायत स्तरावर-2075

मजुर उपस्थिती-16,000

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT