उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पीकविमा शासन भरणार – पालकमंत्री भुसे

अंजली राऊत

नाशिक (लखमापूर) : पुढारी वृत्तसेवा
यंदापासून शेतकर्‍यांचा पीकविमा शासन भरणार असून, जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. तळवाडे येथील कृषिरत्न फाउंडेशनच्या आत्महत्याग्रस्त, शहीद जवान, अपंग व गरीब कुटुंबीयांना बियाणे, खते व साडी-चोळी वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी शासनाबरोबरच समाजमनसुद्धा बदलणे गरजेचे आहे. शेतमाल खरेदी करताना शेतकर्‍यांच्या कष्टाचा व भावनांचा विचार व्हायला हवा, असा विचार पालकमंत्री भुसे यांनी मांडला.

व्याख्याते अविनाश भारती यांनी कृषिप्रधान देशात अन्नदात्यालाच आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर समाजमन व शासनाने चिंतन करायला हवे, असे सांगितले. हवामान तज्ज्ञ दीपक जाधव यांनी बदलत्या हवामानाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागात उल्लेखनीय काम करणार्‍यांचा कृषिरत्न पुरस्काराने सन्मान झाला. कार्यक्रमाला भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ अहिरे, सरपंच ज्योती पाटील, भामेश्वर विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष गोरख कापडणीस, कृषिरत्न फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष योगेश पवार उपस्थित होते. योगेश पवार यांनी प्रास्ताविक, तर राकेश हिरे यांनी सूत्रसंचालन केले.

पुरस्कारार्थी असे : कृषिरत्न समाजभूषण : भूषण पगार, कृषिरत्न आदर्श शेतकरी : बाळासाहेब देवरे (वाजगाव), चंद्रकांत शेवाळे (टेहरे), श्रीकांत वाघ (शिरसमणी), नितीन ठाकरे (वीरगाव). कृषिरत्न आदर्श महिला शेतकरी : मनीषा इंगळे (साकुरी) कृषिरत्न आदर्श पशुपालक : साहेबराव सोनवणे (तळवाडे) कृषिरत्न आदर्श कृषी उद्योजक : केवळ जाधव (सातमाने), स्वप्नील आहिरे (वासुळ), रवींद्र कहांडळ (सटाणा), जीवन आहेर (कळवण) कृषिरत्न आदर्श अधिकारी : दिलीप देवरे (निवृत्त उपविभागीय कृषी अधिकारी)

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT