नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या छपाई विभागाचे संचालक जी. पी. सरकार यांनी गांधीनगर मुद्रणालय व मुद्रणालय वसाहतीची पाहणी केली. मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणाची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या चार महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून लगेचच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी खासदार हेमंत गोडसे यांना दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून गांधीनगर येथील मुद्रणालयाला उतरती कळा लागली असून, त्याला नव्याने झळाळी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तीन वर्षांपूर्वी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे मुद्रणालयाच्या आधुनिकीकरणासाठी पाठपुरावा केला होता. मुद्रणालयाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे कामगार, छपाई आणि कामगार कॉलनीची दुरवस्था झाली आहे. याकडे खा. गोडसे यांनी शहरी विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या लक्षात आणून दिले होते. प्रेसचे अत्याधुनिकीकरण केल्यास तेथे पुन्हा केंद्र सरकारच्या स्टेशनरीची छपाई सुरू होऊन सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या वारसांना न्याय मिळू शकेल. जीर्ण झालेली साधनसामग्री आणि आवारातील इमारतींना झळाळी मिळू शकेल, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर आधुनिकीकरणाला केंद्राने हिरवा कंदील दाखवत सुमारे चारशे कोटींच्या निधीला मंजुरीही दिली.
नॅशनल कंपनीने अत्याधुनिकीकरणाच्या कामाचे मूल्यांकन काढून दिले असून, येत्या चार महिन्यांत कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर काही महिन्यांत आधुनिकीकरणाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याची माहिती सरकार यांनी दिली. यावेळी मुद्रणालयाचे व्यवस्थापक बी. के. सहाणी, राम हरक, रवि आवारकर, गणेश रोकडे, के. एस. व्यंकटेश, समद शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रोजगार निर्मितीस चालना
या कामाला गती मिळावी यासाठी जी. पी. सरकार यांनी प्रेस व प्रेस वसाहतीची पाहणी केली. जीर्ण इमारतींचे नूतनीकरण करण्यात येणार असून, कालबाह्य आणि जीर्ण मशीनरीच्या जागी आधुनिक मशीनरी बसविण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीस चालना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी सरकार यांनी दिली.