कवठेमहांकाळ : अलकूडजवळ अपघातात पोलिस ठार | पुढारी

कवठेमहांकाळ : अलकूडजवळ अपघातात पोलिस ठार

कवठेमहांकाळ; पुढारी वृत्तसेवा :  रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अलकूड (एम) (ता.कवठेमहांकाळ) च्या हद्दीत कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात सांगलीचे पोलिस प्रवीण बाबाराम सोनवणे (वय 43, सध्या रा. सांगली, मूळ गाव नाझरे सांगोला) हे जागीच ठार झाले. कारमधील चालक व अन्य तिघे किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 17) दुपारी घडली.

याबाबत माहिती अशी : प्रवीण सोनवणे हे सांगली मुख्यालयात पोलिस होते. ते मोटारसायकलवरून (एमएच 12 एलई 7632) त्यांचे मूळ गाव नाझरेकडून (सांगोला) सांगलीकडे निघाले होते. कार (एमएच 01 एव्ही 5352) मिरजहून सोलापूरकडे जात होती. अलकूड (एम) च्या हद्दीत एका सिमेंट कारखान्यासमोर कार व मोटारसायकल यांच्यात जोरात धडक झाली. दोन्ही वाहनांची धडक झाल्यानंतर कार उलटली. या अपघातात मोटारसायकलवरील सोनवणे हे जागीच ठार झाले.

कारमधील चालक रविराज शंकर शिंदे हे जखमी झाले. तर अन्य तिघेजण किरकोळ जखमी झाले. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे, पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार ठिकणे, नामदेव दांडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा अपघाताची नोंद करण्याची कारवाई सुरू होती.

Back to top button