उत्तर महाराष्ट्र

नाशिक : डाळिंब मार्केटला आग; लाखो रुपयांचे पॅकिंग साहित्य जळून खाक, जीवितहानी टळली

अंजली राऊत

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर रोडवरील नीलगिरी बागेसमोरील परफेक्ट कृषी डाळिंब मार्केटमधील पत्र्याच्या गाळ्यांना मंगळवारी (दि. २५) मोबाइल चार्जिंग करताना बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली. या आगीत सात गाळ्यांमधील लाखो रुपयांचे फळांचे पॅकिंग करण्याचे साहित्य व पत्रे जळून खाक झाले. यात मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

या गाळ्यांमध्ये प्रामुख्याने प्लास्टिकचे क्रेटस, रद्दी पेपर, पुठ्ठ्यांचे बॉक्स, गवत आदी पॅकिंग करण्याचे साहित्य असल्याने त्यांनी लवकर पेट घेतल्याने एकाच रांगेत असलेल्या सात गाळ्यांना या आगीची झळ पोहोचली. विद्युत दिवे, ट्युबलाइट, वायरीही जळाल्या. घटनेनंतर अग्निशामक दलास कळविण्यात येताच तीन बंबांच्या सहाय्याने आग विझविण्यास यश आले. यातील काही गाळे बंद असल्यामुळे जेसीबीच्या मदतीने गाळ्यातील साहित्य बाहेर काढण्यात आले. पत्रे तोडून आतील आग विझवून पुढील भागातील गाळ्यांना झळ पोहोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. आग विझविल्यानंतर गाळ्यांच्या पुढील भागातील क्रेटस जळून फरशीवर थर जमा झाला होता. तर मागील भागात प्लास्टिक क्रेटसचा लगदा होऊन अनेक क्रेटस एकमेकांना चिकटले होते. पुठ्ठ्यांचे अर्धवट अवस्थेत जळालेले बॉक्स पडून होते. गवताच्या गड्ड्या आवारात फेकण्यात आल्या होत्या. त्यातील काहींना आगीची झळ बसलेली होती. त्यांनी पेट घेऊ नये म्हणून त्यावर पाणी मारण्यात आले होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT