नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
जेलरोड येथील सीआयएसएफ मैदानावर सीआयएसएफ भरतीप्रक्रियेदरम्यान बनावट उमेदवार आढळून आले आहेत. लेखी परीक्षेसाठी वेगळा उमेदवार व मैदानी परीक्षेतील उमेदवाराचे हाताचे ठसे जुळत नसल्याने हा प्रकार उघड झाला. या प्रकरणी दोघांविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
अर्शद अहमद (24, रा. कस्तुरबानगर, साधू वासवानी रोड, नाशिक) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. नेहरूनगर येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी भरत कौशिक यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. कौशिक यांच्या फिर्यादीनुसार, जेलरोड येथील मैदानावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कार्यालय आहे. त्यांच्यातर्फे भरतीप्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी विविध ठिकाणांहून उमेदवार आले होते. शनिवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास भरतीसाठी आलेला उमेदवार अर्शद अहमद याची बायोमेट्रिक तपासणी करण्यात आली. त्याचा फोटो व त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हे ठसे व फोटो यापूर्वी लेखी परीक्षेच्या वेळी घेतलेल्या ठसे व फोटोशी जुळत नसल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आले.
लेखी परीक्षा देणार्या उमेदवाराचा पोलिसांकडून शोध
लेखी परीक्षा दिलेली व्यक्ती आणि मैदानी परीक्षेस आलेला अर्शद अहमद या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोघांविरोधात केंद्र शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्शदला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याचप्रमाणे लेखी परीक्षा देणारा उमेदवार कोण होता, याचा शोध उपनगर पोलिस घेत आहेत.