नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य निवासी शाळेची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक अपर आयुक्तालयातील 17 एकलव्य शाळांमध्ये शासकीय, अनुदानित आणि खासगी शिक्षण संस्थांमधून शिकत असणार्या अनुसूचित/आदिम जमातीच्या इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश दिला जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 13 मे असून, 14 व 15 मे रोजी अर्जाची छाननी होणार आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य मॉडेल निवासी शाळेत इयत्ता सहावीमध्ये नियमित प्रवेश घेण्यासाठी तसेच इयत्ता आठवी ते नववीच्या वर्गातील अनुसूचित जमातीच्या रिक्त जागांवर प्रवेश घेण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थी ज्या शाळेत सद्यस्थितीत शिक्षण घेत आहेत, त्या शाळेकडून आवेदनपत्र प्राप्त करून मुख्याध्यापकांकडे भरून द्यावे लागणार आहे. त्यानंतर मुख्याध्यापक संबंधित प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करतील.
दरम्यान, प्रवेशपरीक्षा इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता या तीन विषयांवर 100 गुणांवर आधारित असणार आहे. इयत्ता सहावीला प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना पाचवीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. तर सातवीसाठी सहावीच्या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. बुद्धिमत्ता विषयासाठी 40, तर गणित आणि इंग्रजी विषयांसाठी प्रत्येकी 30 गुण दिले जाणार आहेत.
1,054 विद्यार्थ्यांना प्रवेश
प्रवेशपरीक्षेच्या माध्यमातून 17 एकलव्य शाळेत 1,054 विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. सर्वाधिक इयत्ता सहावीमध्ये 1,020 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. इयत्ता सातवीसाठी 22, तर आठवी आणि नववीसाठी प्रत्येक 6 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित मुला-मुलींची संख्याही समान राहणार असल्याचे आदिवासी विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.