सातारा : वडूजमध्ये दिवसा ढवळ्याही लाईट सुरुच | पुढारी

सातारा : वडूजमध्ये दिवसा ढवळ्याही लाईट सुरुच

वडूज ; पुढारी वृत्तसेवा : शांत व संयमी वडुजकरांच्या पदरी प्रशासनाच्या अनागोंदी कामकाजामुळे निराशा पडली आहे. शहरात दिवसा ढवळ्या विद्युत पोलवर लाईट सुरु असून याकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

वडूजमधील प्रशासकीय कामकाजाबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. शेजारच्या तालुक्यातील नगरपंचयात क्षेत्रातील रस्ते,सफाई, गटारे यांची कामे पाहून आल्यावर वडूज शहरात पाऊल ठेवताच येथील कामकाजाचा पंचनामा डोळ्याने दिसून येत आहे.

सध्या प्रशासनातील छोट्या मोठ्या आर्थिक तडजोडी, अंतर्गत धुसपूस यामुळे कर्मचार्‍यांवर कोणाचाच अंकुश राहिलेला नाही. त्यांच्यामध्ये गट निर्माण झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी शहरात नवीन पदाधिकारी व सदस्य यांच्या निवडी झाल्या. त्यांच्यात काम करण्याची प्रचंड उमेद व इच्छाशक्ती असताना देखील प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पदाधिकारी व सदस्यांमध्ये नाराजी आहे, असे असतानाच आता शहरात दिवसा ढवळ्या लाईट सुरु ठेवून त्याचा भुर्दंड नागरिकांच्या माथी मारला जाणार आहे.

एकीकडे लोडशेडींगने नागरिक हैराण झाले असताना दुसरीकडे मात्र नगरपंचायतीचे कर्मचारी दिवसा ढवळ्या लाईट सुरु ठेवून वीजेचा अपव्य करत आहेत. नगरपंचायत कर्मचार्‍यांच्या या अनागोंदी कारभारामुळे वडूजवासियांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Back to top button