नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्षे संपत आले असले, तरी कोविड बंद काळातील कोरडा शिधा विद्यार्थ्यांना पुरविण्याच्या राज्य शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार अधिक पौष्टिक असलेल्या फोर्टिफाईड तांदूळ पुरविताना गुणवत्तेबाबत शंका आल्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फूड कॉर्पोरेशनला पत्र लिहून गुणवत्तापूर्ण तांदळाचा पुरवठा करावा, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे तूर्त जिल्ह्यातील तांदूळपुरवठा स्थगित झाला आहे.
जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग असलेल्या चार हजार 727 शाळा आहेत. त्यातील पहिली ते सहावीपर्यंत चार लाख एक हजार 726, तर सहावी ते आठवीपर्यंत दोन लाख 49 हजार विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाकडून पोषण आहार पुरविण्यासाठी ठेकेदार निश्चित होत नसल्याने ऑगस्ट 2021 ते मार्च 2022 पर्यंत पोषण आहार दिला जात नव्हता. आता एप्रिलपासून शाळांमध्ये पोषण आहार देणे सुरू झाले असून, सध्या 727 शाळांमध्ये पोषण आहार देणे सुरू आहे. आता एप्रिलच्या 23 दिवस शाळांमध्ये भोजन मिळणार आहे. ऑगस्ट ते मार्चपर्यंतच्या 174 दिवसांचा कोरडा शिधा विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.
फूड कॉर्पोरेशनकडे पत्र
विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात तांदूळ देताना त्यात अधिकाधिक पौष्टिक घटक असावेत, अशा सूचना शालेय पोषण आहार समितीने दिल्या आहेत. त्यानुसार मनमाड व नाशिकरोड येथील अन्न महामंडळाच्या गोडाऊनमधून 1200 मेट्रिक टन तांदूळपुरवठा करण्यात आला आहे. फोर्टिफाईड प्रकारचा तांदूळपुरवठा करताना जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अडचणीत येऊ नये म्हणून शिक्षण विभागाने फूड कॉर्पोरेशनकडे पत्राच्या माध्यमातून संवाद साधताना चांगल्या प्रतीचा तांदूळपुरवठा करण्याची मागणी केली आहे.