नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वडिलांच्या मृत्यूनंतर काकाने मालमत्तेतून वडिलांचे नाव कमी केले. मात्र, वारसांची नावे लावली नाहीत या रागातून पुतण्याने अल्पवयीन संशयितास सुपारी देत काकाचा खून घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अंबड एमआयडीसीतल्या कर्डेल मळ्यात बच्चू सदाशिव कर्डेल (६८) यांच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांनी बच्चू कर्डेल यांचा पुतण्या संशयित सागर कर्डेल (वय २८) यास अटक केली. सोमवारी (दि. ५) त्याला जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवार (दि. ८)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर विधीसंघर्षित बालकाची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली.
एक्स्लो पॉइंटजवळ २५ नोव्हेंबरला रात्री कर्डेल मळ्यात मारेकऱ्याने बच्चू कर्डेल यांचा खून केला होता. खुनानंतर आरोपीने घरातून पैसे आणि दागिन्याने भरलेली कोठीही चोरली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी कर्डेल यांच्या नातेवाइकांचे जबाब आणि गुप्त माहितीआधारे संशयितांना अटक केली. गुन्हे शाखेसहित आयुक्तालयाची चौदा पथके गुन्ह्याचा तपास करत होते. खुनाची घटना घडली तेव्हा, बच्चू कर्डेल यांचे नातलग नातेवाइकाच्या हळदीसाठी गंगापूर रोड परिसरात होते. नातेवाइक तेथे असतानाच बच्चू कर्डेल यांचा खून झाला. खुनाच्या वेळी संशयित सागर हा हळदीच्या कार्यक्रमातच होता. सागरने सांगितल्यानुसार विधी संघर्षित बालकाने बच्चू कर्डेल यांचा खून केला. तर सागर हा हळदीच्या कार्यक्रमावरून इतर नातेवाइकांसोबतच घरी परतला.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित कर्डेल बंधूंनी अंबड एमआयडीसीत जागा घेतली होती. दरम्यान, सागरच्या वडिलांचे व बच्चू कर्डेल यांचे मालमत्तेवरून वाद होत होते. सागरच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर कर्डेल भावंडांनी एमआयडीसीत खरेदी केलेल्या जमिनीच्या मालकीवरून त्यांचे नाव काढले. तसेच कर्डेल वस्तीत काही गाळ्यांवरूनही बच्चू कर्डेल व सागर यांच्यात वाद सुरू होते. मालमत्तेचा राग, वडिलांशी झालेली भांडणे यावरून सागरने सुपारी देऊन काकाच्या खुनाचा कट रचल्याचे समोर येत आहे.
विधीसंघर्षित बालकावर यापूर्वी चोरीचाही गुन्हा
खून प्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलावर पूर्वी चोरीचा गुन्हा दाखल आहे. संशयित मुलगा कर्डेल यांच्या शेतातही काम करत होता. सागरने त्याच्याशी ओळख वाढवून काकाच्या खुनाची सुपारी देत कट रचला. खुनानंतर चोरलेल्या कोठीतील रोकडमध्ये अल्पवयीन संशयिताचाही वाटा असल्याचे समोर येत आहे.
विहिरीत फेकली कोठी
संशयित अल्पवयीन मारेकऱ्याने बच्चू कर्डेल यांचा खून केल्यानंतर तेथील कोठी चोरून नेली. ही कोठी अल्पवयीन संशयिताने दातीर मळा परिसरातील एका विहिरीत फेकल्याचे समोर आले. सोमवारी अंबड पोलिसांनी ही कोठी हस्तगत केली आहे. पाेलिसांनी काेठीची तपासणी केली असता त्यात सोन्याच्या दोन पुतळ्या, चांदीचे दोन बाजूबंद, कापडी बुरखा, हत्यार, कागदपत्रे व कपडे असा ऐवज मिळून आला. कोठीतील पाच लाख रुपयांची रोकड विधीसंघर्षित बालकाने त्याच्या एका मित्राकडे ठेवली होती. संशयिताने ओळख पटू नये यासाठी बुरख्याचा वापर केल्याचे सूत्रांनी सांगितले.