नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माऊथ फ्रेशनरच्या गाेण्यांखाली गुटख्याचे पाकीटे दडवून परराज्यातून नाशिकमार्गे चाेरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून पथकाने १६ लाख ५८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत १३ लाखांचे माऊथ फ्रेशनर व १५ लाखांचा ट्रक असा मुद्देमालही जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाने आयशर ट्रकचालक, क्लिनर, ट्रकमालक व वाहतूकदारांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
अरुण राठोड (ट्रकचालक, रा. इंदूर), सुनील मौर्या (क्लिनर, रा. गुजरी धामनोद जि. धार), वाहनमालक मुकेश राठोड (रा. धुळे), वाहतुकदार-एमपी नॅशनल रोडवेज, इंदूर तसेच नदीम गोलंदाज व दिलीप बदलानी अशी संशयितांची नावे आहेत. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकमधून पानमसाला व सुगंधित तंबाखुच्या साठ्याची वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक कार्यालयास मिळाली हाेती. त्यानुसार पथकाने एमएच १८ बीजी ४०४४ क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग करुन विल्हाेळी जवळील बटरप्लाय गार्डन जवळ ट्रक अडवला. ट्रकची तपासणी केली असता माउथ फ्रेशनरच्या गोण्यांमध्ये प्रतिबंधित असलेल्या गुटख्याचा साठा आढळून आला.
अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी फिर्याद दिली असून अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यु काळे यांचे मार्गदर्शनाखाली सहआयुक्त (नाशिक) गणेश परळीकर, सहाय्यक आयुक्त (अन्न) उदय लोहकरे, विवेक पाटील तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, योगेश देशमुख व गोपाळ कासार, नमूना सहायक विकास विसपुते, चालक निवृत्ती साबळे यांनी ही कारवाई केली.