उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मोतीवाला कॉलेजच्या अतिक्रमणावर मनपाचा हातोडा ; कारवाई राजकीय हेतूने : संचालकांचा आरोप

अंजली राऊत

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई अधिक तीव्र केली असून, मोतीवाला कॉलेजच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करीत कॅन्टीन, वाहन पार्किंग शेड, रिहृयाबिलेशन सेंटर आदीवर कारवाई केली. दरम्यान, ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मोतीवला कॉलेजच्या संचालक फरहान मोतीवाला यांनी केला आहे.

मनपा आयुक्त रमेश पवार यांच्या सूचनेनुसार सातपूर विभागीय कार्यालयाने परिसरातील या आठवड्यातील तिसरी अतिक्रमणविरोधातील मोठी कारवाई मोतीवाला कॉलेजवर केली आहे. ध्रुवनगर येथील मोतीवाला कॉलेजने आपल्या आवारातील काही अंतर्गत बदल केले होते. या बदलासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता बदल करण्यात आले होते. याबाबत महापालिकेकडे एका माजी नगरसेवकाने तक्रार केली होती. या अगोदर मनपा पथकाने कॉलेजला अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली होती. परंतु अद्यापपर्यंत कॉलेजने अतिक्रमण न काढल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पश्चिम विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय आणि सिडको विभागीय कार्यालयाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त केले. सुमारे दोन तास चाललेल्या या कारवाईत कॉलेजचा अनेक भाग जमीनदोस्त करण्यात आला. दरम्यान, मोतीवाला कॉलेजचे संचालक फरहान मोतीवाला यांनी या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली असून, राजकीय हेतूने प्रेरित ही कारवाई आहे. कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाचा मोबदला दिल्याने महापालिकेचे आभारही मानले. या कारवाईप्रसंगी सातपूरचे विभागीय अधिकारी नितीन नेर, सिडकोचे विभागीय अधिकारी मयूर पाटील, शिवाजी काळे, नगररचना विभागाचे गोकुळ पगारे, अतिक्रमण विभागाचे तानाजी निगळ, मिलिंद जाधव, मयूर काळे, सत्यम शिंदे, उमेश खैरे, सचिन सणस, विजय सपकाळ, प्रमोद आवाळे, गौतम खरे, विद्युत विभागाचे संजय पाटील, दिलीप मोकाशी यांसह मनपाच्या चारही विभागांतील अधिकारी व कर्मचारी, पोलिस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT