नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा :
लोहोणेर गावात बांधलेल्या एका स्वच्छतागृहाचे दोन वेळा वेगवेगळे मूल्यांकन झाल्याने ग्रामस्थांमध्ये साशंकता व्यक्त होत असून, या कामाच्या चौकशीची मागणी युवकांनी केली आहे.
लोहोणेर गावात पिंपळगाव रोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दक्षिण बाजूला पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत सार्वजनिक स्वच्छतागृहाचे बांधकाम झाले आहे. या कामापोटी 1 लाख 71 हजार 972 रुपयांचा निधी अदा करण्यात आला. या कामाविषयी शंका उपस्थित झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते चेतन परदेशी व समाधान महाजन यांनी ग्रामविकास अधिकार्यांकडे विचारणा केली. परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने या युवकांनी थेट पंचायत समितीच्या इमारत व दळणवळण विभागाकडून पुनर्मूल्यांकन अहवाल मिळविला. उपअभियंता चव्हाण यांनी सादर केलेल्या अहवालात या कामाची रक्कम ही 1 लाख 42 हजार 732 रुपये इतकीच असल्याचे स्पष्ट झाले. 29 हजार 263 रुपयांची तफावत निदर्शनास आल्याने या कामात शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन सबंधित अधिकार्यांकडून सदर रक्कम वसूल करून शासन तिजोरीत जमा करावी, अशी मागणी परदेशी व महाजन यांनी गटविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
शाखा अभियंता यांनी पहिले मूल्यांकन दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी केले होते. बांधकाम अभियंत्यांनी ग्रामपंचायतीला इस्टिमेट करून दिले आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीने ठेकेदाराला दि. 25 मार्च 2022 रोजी बिल अदा केले. तक्रारीनंतर शाखा अभियंता यांनी पुन्हा दि. 13 मे 2022 रोजी 1 लाख 42 हजार 732 रुपयांचे मूल्यांकन दिले. या कामात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. या प्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. – पूनम पवार, सरपंच, लोहोणेर.