नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
परिसरातील दुर्गा चौकातून रस्ता ओलांडत घराकडे जाणारे वयोवृद्ध सिटीलिंक बसच्या धडकेत जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. निंबा उखा ह्याळीज ( 85, रा. रायगड चौक) असे वृद्धाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.10) सकाळी साडेआठच्या सुमारास पवननगरकडून सिटीलिंक बस (एमएच 15 जीव्ही 7967) भरधाव वेगात जिल्हा रुग्णालयाकडे जात होती. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने दिव्या अॅडलॅब चौकाच्या वळणावर मॉर्निंग वॉक करून घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडणारे ह्याळीज यांना बसने धडक दिली. यात ते खाली पडले व मागच्या चाकाखाली ते सापडले. गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. त्यांच्यासोबत अन्य दोघेही रस्ता ओलांडत होते, मात्र ते बचावले.
माहिती मिळताच शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर घटनास्थळी पोहोचून पोलिसांना कळविले. यावेळी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या प्रकरणी अंबड पोलिसात बस जमा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिडकोतील उंटवाडी ते त्रिमूर्ती चौक भागात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उंटवाडी ते दिव्या अॅडलॅब्सपर्यंत उड्डाणपुलासाठी मंजुरी मिळाली आहे. तरीही काम सुरू झालेले नाही याची खंत वाटते.
– सुधाकर बडगुजर,
महानगरप्रमुख, शिवसेना