अंडाभुर्जी गाड्या आणि दारु विक्री www.pudhari.news  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : यंत्रणेच्या डोळ्यावर पट्टी; अंडाभुर्जीच्या गाड्यांवर दारूपार्टी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सीबीएस परिसरातील जिल्हा न्यायालयासमोरच अंडाभुर्जीच्या गाड्यांवर ज्या पद्धतीने सर्रासपणे दारूविक्री आणि पार्टी सुरू आहे, त्यावरून पोलिस यंत्रणेचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट होत आहे. रात्री 8 पासून या ठिकाणी दारूविक्री सुरू होते. तळीराम याच ठिकाणी मैफल भरवितात आणि खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतात. हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा न्यायालयासमोरील होमगार्ड कार्यालयालगतच्या भिंतीला लागून अंडाभुर्जीचे हातगाडे एका रांगेत बघावयास मिळतात. दिवसभर या ठिकाणी अंडाभुर्जी व इतर खाद्यपदार्थांची विक्री होते. रात्री 8 नंतर मात्र या भागाला 'ओपन बार'चे स्वरूप येते. तळीराम बाहेरून दारू घेऊन येतात अन् या ठिकाणी पर्टी करतात. या ठिकाणी असलेल्या भुयारी मार्गाला लागून असलेल्या फुटपाथवर अंडाभुर्जीवाल्यांकडून खुर्च्या-टेबलची सोय करून दिली जाते. त्यामुळे तळीराम रात्री उशिरापर्यंत येथे तळ ठोकून असतात. या परिसरात हॉटेल्स, वकिलांचे चेंबर, झेरॉक्सची दुकाने, सायबर कॅफे तसेच इतरही दुकाने आहेत. त्यामुळे या विक्रेत्यांना तळीरामांचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. बर्‍याचदा येथे हाणामारीचे प्रकारही होत असल्याने त्याचाही त्रास परिसरातील विक्रेत्यांना सहन करावा लागतो. दरम्यान, न्यायालयासमोरच अत्यंत अवैधरीत्या सुरू असलेल्या या 'ओपन बार'वर पोलिसांकडून का कारवाई केली जात नाही असा सवाल नाशिककरांकडून उपस्थित केला जात आहे. कारण सीबीएस हा अत्यंत वर्दळीचा परिसर असून, या ठिकाणी असलेल्या एसटी स्टॅण्डवर राज्यभरातील प्रवासी येत असतात. अशात त्यांना तळीरामांचा उपद्रव सोसावा लागण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून हा प्रकार थांबवावा, अशी मागणी केली जात आहे.

ओपन बार अन् गुन्हेगार..
न्यायालयासमोर असलेल्या या 'ओपन बार'मध्ये गुन्हेगारांचा सर्वाधिक राबता असतो. कारण न्यायालयीन कामकाज किंवा तारखांसाठी न्यायालयात आलेले गुन्हेगार याच ठिकाणी मैफल भरवितात. अशात त्यांच्याकडून परिसरात दहशत माजविण्यासह गुन्हेगारी कृत्ये होण्याचीही दाट शक्यता असल्याची भीती परिसरातील विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT