उत्तर महाराष्ट्र

नाशिक : तांदूळ, मैदा निर्यातीचे आमिष ; राईस मिल संचालकाला ८० लाखांचा गंडा

गणेश सोनवणे

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

परदेशात भाव वाढले असल्यामुळे तांदूळ, मैदा आदी निर्यात केल्यास मोठा नफा होईल असे आमिष दाखवून बोरिवली मुंबई येथील दोघांनी इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील योगेश्‍वर राईस मिलचे संचालक माधव लक्ष्मण काळे (वय ६३) यांची तब्बल ८० लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत माधव लक्ष्मण काळे (रा. घोटी) यांनी घोटी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

तक्रारीनुसार बोरिवली येथील रहिवासी जयेश भरत बर्मन व भरत बर्मन (रा. अनुराधा अपार्टमेंट, सहकार निकेतन हाऊसिंग सोसायटी, गोविंदनगर, बोरिवली पश्‍चिम, मुंबई) यांनी वेळोवेळी काळे यांना दक्षिण आफ्रिकेत व परदेशात तांदळाचे भाव वाढल्याचे आमिष दाखविले. निर्यात केली तर त्यांना चांगली किंमत मिळू शकेल. तुमचा तांदूळ निर्यात करण्यासाठी आम्ही मदत करू, असे सांगून काळे यांचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर निर्यातीचा परवाना काढण्यासाठी 12 ते 15 लाख रुपये लागतात. तो आम्ही 10 लाखांत मिळवून देतो, असे सांगून जयेश बर्मन यांनी काळे यांना संत तुकाराम साखर कारखाना येथे नेऊन 3 लाख 11 हजार रुपये डीडीद्वारे भरून घेतले.

यापाठोपाठ आफ्रिकेमध्ये आटा व मैदा यांचेही भाव वाढले आहेत अशी बतावणी आरोपींनी केल्यामुळे काळे यांनी नाशिकरोडच्या मोठ्या व्यापार्‍याकडून 4 लाख 23 हजार 750 रुपये किमतीचा आटा व मैदा खरेदी केला. मात्र यानंतर आरोपींनी या मैद्याची निर्यात केलीच नाही. त्यामुळे या किमतीचा भुर्दंड काळे यांना सहन करावा लागला. तसेच तांदूळ निर्यातीसाठी काळे यांनी आरोपींना 25 किलो वजनाची एक बॅग असा 119 टन वजनाचा 38 लाख 37 हजार 497 रुपये किमतीचा तांदूळ पॅकिंग करून न्हावाशेवा बंदरात पाठवून दिला. या तांदळाचा वाहतूक खर्च म्हणून 7 लाख 50 हजार रुपये घेतले. पण हा तांदूळ त्यांनी आपण स्वत:च घोटीच्या योगेश्‍वर राईसचे मालक व संचालक आहोत, असे भासवून काळे यांचा तांदूळ स्वत:च्या नावाने निर्यात करून आलेल्या रकमेचा अपहार केला. यासह विविध कारणांनी वेळोवेळी रोख व इतर माध्यमांतून आरोपींनी काळे यांची एकूण 79 लाख 22 हजार 247 रुपयांची फसवणूक केली आहे. घोटी पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भरत बर्मन व जयेश बर्मन यांच्याविरुद्ध भा. दं. वि. कलम 420, 465, 467, 471 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु झाला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT