उत्तर महाराष्ट्र

नाशिक : जूनअखेर विमानसेवा येणार पूर्वपदावर; नाशिक-गोवा फ्लाइट सुरू होण्याची शक्यता

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकहून विविध शहरांमध्ये सुरू करण्यात आलेली विमानसेवा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद पडली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रभाव बर्‍यापैकी ओसरल्याने, ही विमानसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. जून महिनाअखेरपर्यंत नाशिकहून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, गोवा, बेळगाव, पुणे आदी शहरांमधील बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने, निर्बंध जारी करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येवर मोठा परिणाम दिसून येत होता. परिणामी विमान कंपन्यांनी काही काळापर्यंत विमानसेवा खंडित केली. आता निर्बंध शिथिल झाल्याने, पुन्हा एकदा कंपन्यांकडून विमानसेवा सुरू केली जाण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नाशिकहून स्टार एअर व अलायन्स एअर या कंपन्यांची नाशिक, बेळगाव ही विमानसेवा सुरू आहे. त्याचबरोबर नाशिक, अहमदाबाद हॉटिंग दिल्ली ही सेवादेखील सुरू आहे. या महिनाअखेरपर्यंत ट्रुजेट आणि स्पाइज जेट या कंपन्या पुन्हा एकदा आपली विमानसेवा सुरू करण्याची शक्यता आहे. ट्रुजेटकडून नाशिक-अहमदाबाद तर स्पाइज जेटकडून दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद आणि गोवा ही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, विमानसेवा पूर्ववत झाल्यास नाशिकच्या व्यापार उद्योगाला पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता आहे. आज पुन्हा नाइट लॅण्डिंग : शिर्डी विमानतळावर नाइट लॅण्डिंगची व्यवस्था नसल्याने, आज पुन्हा एकदा स्पाइट जेटकडून नाशिक विमानतळावर नाइट लॅण्डिंग केले जाणार आहे. स्पाइज जेट विमान कंपनीची वेबसाइट हॅक केल्याने, विमानसेवेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. त्यामुळे स्पाइज जेटच्या विमानसेवांच्या वेळांवर याचा परिणाम होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यातच स्पाइज जेटने नाशिक विमानतळावर नाइट लॅण्डिंग केले होते. शनिवारी (दि.4) पुन्हा एकदा नाइट लॅण्डिंग केले जाणार आहे. कोरोना काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे कंपन्यांनी विमानसेवा खंडित केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा विमानसेवा सुरू व्हाव्यात याकरिता आम्ही प्रयत्नशील आहोत. नाशिकच्या देशातील सर्वच प्रमुख शहरांशी जोडले जावे हा आमचा प्रयत्न आहे. यामुळे नाशिकच्या व्यापार आणि उद्योगाला गती मिळण्यासही मदत होईल, असे एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी संगितले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT