उत्तर महाराष्ट्र

Nashik : …अन् बिबट्या मादीने नेले तीनही बछडे सुरक्षितस्थळी

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

पाथर्डी शिवारातील वाडीचे रान परिसरात डेमसे मळ्यात ऊस तोडणी सुरू असताना आढळलेले बिबट्याचे तीन बछडे रविवारी तब्बल आठ तासांच्या प्रतीक्षेनंतर मादी सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली. बछड्यांची व त्यांच्या आईची गाठ घालून देण्यात वन विभागाला यश आले आहे. ही घटना वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरात कैद झाली.

वाडीचे रान परिसरातील कैलास डेमसे यांच्या उसाच्या मळ्यात ऊसतोड सुरू असताना रविवारी दुपारी बिबट्याचा एक बछडा आढळून आला. यानंतर काही वेळात पुन्हा दोन बछडे याच ठिकाणी आढळून आले. डेमसे यांनी तत्काळ वनविभागाला या घटनेची माहिती देत ऊसतोडणी थांबवली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येत तिघा बछड्यांना शेतातच नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठिकाणी ठेवले. साधारण एक महिना वयाचे हे नर जातीचे तीन बछडे होते. मादीच्या हालचाली टिपण्यासाठी वनक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव यांनी मळ्यामध्ये तीन ट्रॅप कॅमेरे व ३६० डिग्रीमध्ये फिरणारा एक ऑनलाइन कॅमेरा बसवला होता. बछड्यांना शोधण्यासाठी मादी येणार असल्याने वनविभागाने शेतकरी व ग्रामस्थांना सतर्क केले होते. अखेर रविवारी रात्री नऊच्या सुमारास मादी शेतात आली आणि आपल्या तिघा पिलांना घेऊन गेली. मादीचे आणि बछड्यांची पुन्हा गाठभेट झाल्याने वनविभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT