उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘त्या’ आश्रमचालकाच्या घरात सापडली एअरगन

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील ज्ञानदीप गुरुकुल आश्रमातील अत्याचार प्रकरणी सातव्या पीडित मुलीचा इन कॅमेरा जबाब घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी आश्रमासह संस्थाचालक हर्षल मोरे याच्या निवासस्थानाची झडती घेत बागलाण येथील घरातून एअरगन जप्त केली होती. ती एअरगन तांत्रिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पाठविली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

विनापरवानगी आश्रम सुरू करून हर्षलने आदिवासी मुला-मुलींना रो-हाउसमध्ये ठेवले होते. त्यापैकी सात मुलींवर हर्षलने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी म्हसरूळ व ग्रामीण भागात हर्षलविरोधात अत्याचार, पोक्सो, अ‍ॅट्रॉसिटीसह इतर कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. त्यानुसार पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, सातव्या पीडितेचा जबाब पोलिसांनी इन कॅमेरा नोंदविला आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल मोरे हा पीडितांना एअरगनचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार करत होता. त्यामुळे पोलिसांनी जप्त केलेल्या एअरगनचाही तपास सुरू केला आहे. तपास पथकाने शनिवारी (दि. 3) आश्रमाचा पंचनामा करीत झडती घेतली. त्यात नव्याने काही आक्षेपार्ह आढळले नसून, आता सातही गुन्ह्यांची साखळी जोडण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकरणी विश्वस्तांची चौकशी पोलिस करत आहेत.

मोरेला आश्रमात नेत तपास
पंचवटी : संशयित हर्षल मोरेला म्हसरूळच्या ज्ञानदीप गुरुकुल आश्रमात नेऊन तिथे त्याची कसून चौकशी करण्यात आली. हा पंचनामा व तपास व तसेच मुलींचेही जाबजबाब इन कॅमेरा करण्यात आले. न्यायालयाने मोरेची कोठडी 6 डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. शुक्रवारी (दि. 2)सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी पथकासह आश्रमात पुन्हा कसून तपास केला. पोलिसांनी हा आश्रम मसीलफ केला असून, विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दि किंग फाउंडेशनच्या विश्वस्तांचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. आश्रमातील विश्वस्तांना मोरेच्या गैरकृत्याबद्दल कल्पना होती का, याचा तपास केला जात आहे. मोरे अनेकदा मुलांनाच द्रोण तयार करण्यास सांगून त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेत असल्याचेही उघड झाले आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT