नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मित्र-मैत्रिणींसोबत पर्यटनासाठी आलेल्या मालेगावच्या 18 वर्षीय तरुणाचा गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाला. स्पंदन बिंदुमाधव गायकवाड (18, रा. मालेगाव कॅम्प) असे या युवकाचे नाव आहे. गंगापूर धरण समूहातील सावरगाव शिवारातील चैतन्य फार्म भागात ही घटना घडली.
या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. स्पंदन हा मित्र-मैत्रिणींसमवेत फिरण्यासाठी शनिवारी (दि.21) गंगापूर डॅम भागात आला होता. चैतन्य फार्म जवळील धरणाच्या पाण्यात सायंकाळच्या सुमारास तो हात-पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडाला होता. उर्वरित मित्रमंडळीने आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेत शोधकार्य सुरू केले. जीवरक्षकांनी स्पंदन यास शोधले, मात्र त्याचा मृत्यू झाला होता.