उत्तर महाराष्ट्र

Nashik : पीएफआय विरोधातील गुन्ह्याच्या तपासास 45 दिवसांची मुदतवाढ 

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

देश विघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या 'पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया' (पीएफआय) या संघटनेच्या पाच संशयितांना दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) सप्टेंबरमध्ये अटक केली होती. त्यानंतर सखोल तपासात ऑक्टोबरमध्ये एक व नोव्हेंबरमध्ये एक अशा एकूण सात संशयितांना अटक केली आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एटीएसने ९० दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालयाने ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नेतृत्वाखाली राज्यात दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) नाशिक पथकाने सुरुवातीस २२ सप्टेंबर रोजी छापासत्र राबवून मालेगाव, पुणे, बीड व कोल्हापूर येथून पाच संशयितांना अटक केली आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये या पाच संशयितांचे मोबाइल व लॅपटॉप फॉरमॅट करून देणाऱ्यास, तर संशयितांच्या संपर्कात असलेल्या सहाव्या संशयितास नोव्हेंबर महिन्यात अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून, या प्रकरणी दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदत संपत होती. त्यामुळे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात मंगळवारी (दि. २०) युक्तिवाद करत तपासास मुदतवाढ देण्याची विनंती केली. त्यात संशयितांकडून जप्त केलेल्या मोबाइल, लॅपटॉपमधील फॉरेन्सिक तपास प्रलंबित असून, त्यातील डाटा मिळवणे बाकी आहे. इतर अनुषंगाने तपास बाकी असून, संशयितांबद्दलही तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे ॲड. मिसर यांनी तपासास ९० दिवसांची वाढ मागितली होती. बचाव पक्षाच्या वतीने त्यास हरकत घेण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने एटीएसला तपासासाठी ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

अटकेत असलेल्या संशयितांची नावे

मौलाना सैफुर्रहमान सईद अन्सारी (२६, रा. हुडको कॉलनी, मालेगाव), पुण्यातून अब्दुल कय्युम बादुल्ला शेख (४८), रझी अहमद खान (३१, दोघे रा. कोंढवा, पुणे), वसीम अझीम ऊर्फ मुन्ना शेख (२९, रा. अजीजपुरा, बीड), मौला नसीसाब मुल्ला (रा. सुभाषनगर, कोल्हापूर), उणेस उमर हयाम पटेल (३२, रा. जळगाव), इरफान दौलत खान नदवी ऊर्फ मौलाना इरफान खान (३५, रा. गुलशेरनगर, मालेगाव)

 हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT