Sardar Sarovar dam security
नंदुरबार : महाराष्ट्राच्या सीमेलगत नंदुरबार जिल्ह्यापासून दीडशे किलोमीटर अंतरावर गुजरात हद्दीत आशिया खंडातील सर्वात मोठे सरदार सरोवर हे धरण आहे. त्याचबरोबर सरदार वल्लभ भाई पटेल यांचा सर्वात उंच असा पुतळा म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी देखील याच भागात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरात संबंधित यंत्रणा दक्षता घेत असून नजर ठेवून आहे.
सरदार सरोवर धरण भारतातील नर्मदा नदीवरील सर्वात मोठे धरण आहे. गुजरात राज्यात असले तरी नंदुरबार पासून दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर असून हे धरण नर्मदा खोरे प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे.
सरदार सरोवर या धरणाची उंची १६३ मीटर आहे. शिवाय धरणापासून जवळच काही किलोमीटर अंतरावर स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे लोहपुरुष सरदार पटेल यांचा मोठा भव्य असा पुतळा देखील आहे. या सर्व दृष्टिकोनातून आताची युद्धजन्य स्थिती लक्षात घेऊन या भागात सुरक्षा यंत्रणांनी विशेष लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.
सुरक्षेची विशेष दक्षता घेतली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन आणि नर्मदा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून गुजरात शासन नजर ठेवून असल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून भारत सरकारने बुधवारी विविध ठिकाणी मॉक ड्रिल केले.
त्यात नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्प, तेथील जलविद्युत प्रकल्प तसेच स्टॅच्यू ऑफ युनिटीसह महत्त्वाच्या परिसरात प्रात्यक्षिके करण्यात आली.
या मॉकड्रिलमध्ये नर्मदा जिल्हा प्रशासनाचे विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. दुपारी ४ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान विविध प्रकारच्या सूचना करून प्रात्यक्षिकांसह नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली. दुपारी ४ वाजता सायरन वाजविण्यात आले, तर पाच ते साडेसातदरम्यान फायर मॉक ड्रील झाले.
सायंकाळी साडेसात ते आठ वाजता केवडिया शहरासह सर्व भागातील वीज दिवे बंद करण्यात आले होते. नागरिकांनीही आपापल्या घरातील दिवे बंद केले होते. हे ब्लॅकआउट कशासाठी केले त्याबाबत प्रशासनाने नागरिकांना माहिती दिली.