Nandurbar school transfer scam
नंदुरबार : वर्धा आणि मुंबई येथील शैक्षणिक संस्था आपल्या परिसरात हस्तांतरित करून देण्याचे आश्वासन देऊन सुमारे ८० लाख ७६ हजार रुपये घेतल्याच्या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
श्रीराम देविदास पटेल (वय ६६ वर्ष), व्यवसाय शेती, रा. पातोंडा, ता. जि. नंदुरबार यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, संत ठाकरे महाराज विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्गीय प्राथमिक आश्रम शाळा (मौजे सारवाड, ता. कारंज्या, जि. वर्धा) आणि वसंतदादा पाटील शिक्षण संस्था, भांडूप, मुंबई येथील शाळा आपल्या पातोंडा येथील सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळाकडे हस्तांतरित करून दिली जाईल, असे गणेश तुकाराम पटेल (रा. डांमरखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार) यांनी सांगितले.
सन २००९ ते २०२१ या कालावधीत गणेश पटेल यांनी श्रीराम पटेल यांच्याकडून वेळोवेळी रोख रक्कम घेऊन एकूण ८० लाख ७६ हजार रुपये घेतले. मात्र शाळा हस्तांतरित होणार आहे का, याबाबत विचारले असता त्यांनी खोटे सांगून टाळाटाळ केली. व्हॉट्सअॅपवर खोटे कारणे देऊन वेळोवेळी फसवणूक केली आणि अद्याप कोणतीही रक्कम परत केली नाही.
त्याचप्रमाणे छबीलदास कापसे (रा. कल्याण) यांनाही मोबाइल कॉल आणि मेसेजद्वारे पैसे देण्याचे आश्वासन देऊन टाळाटाळ केली.
याबाबत गणेश तुकाराम पटेल (रा. डामरखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार), छबीलदास कापसे (रा. कल्याण) आणि एक महिला (पूर्ण नाव अज्ञात) यांच्याविरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भांन्सी अधिक तपास करत आहेत.