Nandurbar Collector Office Pudhari
नंदुरबार

Nandurbar Bomb Threat | बॉम्बची धमकी; नेमके प्रकरण काय? : नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनी केला खुलासा

धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar Post Office Bomb Threat

नंदुरबार: राज्यातील सर्व पोस्ट ऑफिस आणि पासपोर्ट कार्यालयांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी 12:10 वाजता सायनॉइड विषारी वायू मिश्रित आरडीएक्स बॉम्बद्वारे स्फोट करण्याची धमकी या ईमेलमध्ये देण्यात आली होती. मात्र, पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने केलेल्या कसून तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

नेमकी घटना काय?

25 मार्च 2026 रोजी सकाळी नंदुरबार येथील पोस्ट व पासपोर्ट कार्यालयाला वरीष्ठ कार्यालयाकडून एक ईमेल प्राप्त झाला. या ईमेलमध्ये राज्यातील सर्व पोस्ट व पासपोर्ट कार्यालये बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. ही कार्यालये नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतच स्थित असल्याने तातडीने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी यांना याबाबात माहिती देण्यात आली.

सुरक्षेसाठी इमारत केली रिकामी

घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ पावले उचलली. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त आलेल्या नागरिकांना तात्काळ इमारतीबाहेर काढण्यात आले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती .

'सिंबा' श्वानाच्या मदतीने शोधमोहीम

पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, पोलीस निरीक्षक निलेश देसले आणि बॉम्ब शोधक पथकाने (BDDS) घटनास्थळी धाव घेतली. बॉम्ब शोधक पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉग स्कॉडमधील 'सिंबा' या श्वानाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली.

परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

दीर्घकाळ चाललेल्या या तपासणीत कोणतीही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू सापडली नाही. तपासणी पूर्ण झाल्यानंतर सर्व कार्यालयांचे कामकाज पुन्हा सुरळीत करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सध्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मेटल डिटेक्टरने तपासणी केल्यानंतरच सर्वांना प्रवेश दिला जात आहे.

प्रशासनाचे आवाहन

“नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करू नये आणि शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत”.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT