नंदुरबार : येथील युवकाची हत्या करणाऱ्यांना फाशी द्या; या मागणीसाठी दिनांक 24 सप्टेंबर 2025 नंदुरबार शहरात काढण्यात आलेल्या अभूतपूर्व निषेध मोर्चाला हिंसक वळण लागले त्यानंतर झालेल्या तुफान दगडफेक व तोडफोडीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वाहन, दोन मोबाईल व्हॅन सह एकूण 18 वाहनांचे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निवासस्थानात देखील तोडफोड झाली आहे.
दरम्यान, दगडफेकप्रकरणी १५४ जणांना अटक करण्यात आली असून यात १२ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील १४२ जणांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दि.२९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा संदर्भ असा की, येथे दि.१६ सप्टेंबर रोजी शहरात झालेल्या युवकाच्या हत्येप्रकरणी काल दि.२५ सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरात अभूतपूर्व निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अचानक मोर्चेकर्यांमधील काही असामाजिक तत्वांच्या टोळक्याने दगडफेक सुरु केली तसेच शासकीय वाहनांची तोडफोड सुरु करण्यात आली. त्यानंतर मोर्चेकर्यांकडून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला तसेच अश्रृधुराच्या कांडया फोडल्या.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस ठाण्यात केलेल्या नोंदीत म्हटले आहे की, नंदुरबार शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जलसंपदा कार्यालय, प्रादेशीक परिवहन कार्यालय, ड्रायविंग स्कुल ऑफिस, नवापुर चौफुली, जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांचे निवासस्थान इतक्या ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडले. दगडफेकीत चार शासकीय वाहने, आठ खाजगी वाहने, मोटरसायकली, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन वाहने, अप्पर पोलीस अधीक्षकांचे वाहन, शहर मोबाईलचे दोन वाहने अशा एकुण १८ वाहनांचे नुकसान झाले आहे.
या दगडफेकीत धुळे येथील राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक अखलाकखा मुबारक पठाण, हेकॉ भरत अशोक बच्छाव, चालक पोलीस नाईक अमोल रविंद्र इथापे, पोलीस मुख्यालयातील हेकॉ कैलास सोनवणे हे जखमी झाले आहेत. दगडफेकीत चार शासकीय वाहने, आठ खाजगी वाहने, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारातील तीन वाहने, अप्पर पोलीस अधीक्षकांचे शासकीय वाहन, शहर मोबाईलची दोन वाहने अशा एकुण १८ वाहनांचे नुकसान झाले आहे. यात एक शासकीय मोटरसायकल पूर्णपणे जाळण्यात आली आहे.
शेकडो जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या १४२ जणांना आज न्यायालयात हजर केले असता दि.२९ सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालय परिसरात मोठया प्रमाणावर गर्दी जमल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.