वाहनासह एकूण सुमारे 23 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. Pudhari
नंदुरबार

Wildlife Trafficking Nandurbar | धक्कादायक! भाजीपाला कॅरेटच्या आड प्राणी-पक्ष्यांची तस्करी; नंदुरबार पोलिसांनी मालेगावच्या तिघांना पकडले

5 कोल्हे, 99 हिरव्या रंगाचे लाल चोचीचे अलेक्झांड्रिन जातीचे पोपट आणि 190 तितर पक्षी जप्त

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar animal bird smuggling

नंदुरबार : नंदुरबारमध्ये वन्यजीव तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी धुळे–सुरत महामार्गावर कारवाई करत भाजीपाला कॅरेटच्या आडून प्राणी आणि पक्ष्यांची तस्करी केली जात असल्याचे समोर आणले. या प्रकरणी मालेगाव येथील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून या रॅकेटचे धागेदोरे मालेगाव आणि धुळे जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका वाहनातून 5 कोल्हे, 99 हिरव्या रंगाचे लाल चोचीचे अलेक्झांड्रिन जातीचे पोपट आणि 190 तितर पक्षी जप्त केले. वाहनासह एकूण सुमारे 23 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या सर्व वन्यजीवांना सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल 2026 रोजी मालेगावहून गुजरातकडे जाणाऱ्या लाल रंगाच्या (MH 41 AU 2352) वाहनातून वन्यजीवांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी परिसरातील बर्डीपाडा टोलनाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. रात्री उशिरा संशयित आयशर वाहन अडवून तपासणी केली असता भाजीपाला कॅरेटमध्ये लपवून प्राणी-पक्षी वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर चालकासह इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी आपली नावे शहजाद अहमद अतिक अहमद (वय 47), मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक (वय 32) आणि शेख सोहेल शेख अफजल कुरेशी (वय 24), सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक अशी सांगितली. प्राथमिक चौकशीत त्यांनी मालेगावातील काही व्यक्तींनी हे वन्यजीव गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचवण्यासाठी दिल्याची कबुली दिली.

या प्रकरणी तिघांविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 3 (5) तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, असई राकेश वसावे, दिनेश चित्ते, विशाल नागरे, मनोज नाईक, सचिन वसावे, जितु पाडवी, जितेंद्र तोरवणे, अभय राजपुत यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT