नंदुरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क | बिरसा फायटर या आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या बंद नंतर गुरुवार (दि.12) सकाळ पासूनच शहादा शहरातील सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहादा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींच्या जमिनी हडप केल्या असल्याच्या विरोधात आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे.
आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर कायदेशीर कोणतरही कारवाई होत नाही नसल्याने शहादा शहर गुरुवार (दि.12) बंद ठेवण्यात आला असून त्यास शहरवासियांकडून प्रतिसाद मिळतो आहे. आमदार रघुवंशी यांच्याकडून आदिवासी संघटनांबद्दल अपशब्द वापरला असल्याचा आरोप देखील आदिवासी संघटनांनी केला असून आमदार रघुवंशी विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीररित्या फेरफार करून हडप केल्याचा गंभीर आरोप करीत विविध आदिवासी संघटनांनी चंद्रकांत रघुवंशी यांचे विधानपरिषद सदस्यत्व रद्द करा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद अध्यक्ष यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. या मागणीचे निवेदन नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील देण्यात आले.