Nandurbar LIC Agent Fraud  Pudhari
नंदुरबार

Nandurbar Crime | विमा एजंटचा धक्कादायक कारनामा; जिवंत विमाधारकाचा बनावट मृत्यू दाखवून एलआयसीत पावणेकोटींचा अपहार

Nandurbar Fraud Case | विमा एजंटसह पुण्यातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar LIC Agent Fraud

नंदुरबार : एका विमा एजंटने जिवंत असलेल्या विमाधारकांचे बनावट मृत्यू दाखले तयार करून भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी)ची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकारातून सुमारे ७५ लाख ८६ हजार ६१० रुपयांचा अपहार झाल्याचे उघड झाले असून, एलआयसीच्या शाखाप्रमुखांच्या फिर्यादीवरून संबंधित विमा एजंटसह पुण्यातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी नंदुरबार येथील एलआयसी कार्यालयातील शाखाप्रमुख सौरव सुशील चंद्र यांनी १६ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार नंदुरबार येथील एलआयसी कार्यालय आणि नाशिकमधील गडकरी चौक येथील एलआयसी शाखा क्रमांक ९६१ येथे मे २०१५ ते मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉलिसी एजंट फिरोजखान अहमदखान पिंजारी याने आणखी चार जणांच्या संगनमताने विमाधारकांची फसवणूक करण्याचा कट रचला होता. या टोळक्याने विमाधारकांना वारसदार दाखवून त्यांना मयत ठरवले. मृत्यूशी संबंधित कागदपत्रांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून खोटे मृत्यू दाखले तयार करण्यात आले. त्यानंतर नंदुरबार नगर परिषदेकडून मृत्यु प्रमाणपत्र मिळवून विमाधारकांचे टर्म क्लेम सादर करण्यात आले.

अशा प्रकारे खोटे दस्तऐवज तयार करून विमाधारकांचे मृत्यू दावे दाखल करत एलआयसीची दिशाभूल व फसवणूक करण्यात आली आणि एकूण ७५ लाख ८६ हजार ६१० रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणात कटकारस्थान रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याच्या आरोपाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विमा एजंट फिरोजखान अहमदखान पिंजारी याच्यासह आख्यतारी फिरोजखान पिंजारी, वसीमखान फिरोजखान पिंजारी (तिघे रा. गणेश नगर, कोरीट रोड, नंदुरबार) तसेच विजय मंगेश लांबोळे, अनिता विजय लांबोळे व कार्तिक विजय लांबोळे (सर्व रा. चिंचवड-पिंपरी, जि. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक निलेश देसले करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT