FDA Raid Pudhari
नंदुरबार

Nandurbar FDA Raid | 'एफडीए'ची नंदुरबार जिल्ह्यात धडक कारवाई; दोघांचे परवाने रद्द, एकावर गुन्हा दाखल

तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यांतील अन्न आस्थापनांवर कारवाई; मुदतबाह्य खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि प्रतिबंधित गुटख्याचा साठा उघड

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar Food And Drug Administration

नंदुरबार : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात धडक तपासणी मोहीम राबवली. तळोदा, नवापूर आणि शहादा तालुक्यांमध्ये करण्यात आलेल्या या कारवाईत गंभीर अनियमितता आढळून आल्याने संबंधित आस्थापनांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

तळोदा येथील एका अन्न विक्री पेढीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता तसेच मुदतबाह्य खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे तपासणीत आढळले. या प्रकरणी संबंधित पेढीचा परवाना रद्द करण्यात आला.

नवापूर शहरातील कचेरी रोड परिसरातील एका चिकन बिर्याणी सेंटरमध्ये अन्नपदार्थ अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरणात तयार केले जात असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याने या आस्थापनेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

दरम्यान, शहादा तालुक्यातील वडाळी येथील ‘मामाजी ट्रेडर्स’ या आस्थापनेवरही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवल्याचे आढळून आले. या प्रकरणी आस्थापनेची नोंदणी रद्द करण्यात आली असून संबंधितांविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबतची माहिती त्यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही : तुकाराम मुंढे

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंढे (भा.प्र.से.) यांनी स्पष्ट भूमिका मांडली. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणारे प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसून, भेसळ किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

नागरिकांनी तक्रार करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानके आणि नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच अन्नपदार्थ तयार करताना व विक्री करताना स्वच्छता आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत नागरिकांना कोणतीही शंका असल्यास त्यांनी आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता देऊन अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करावी, असेही सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT