Nandurbar Fake Liquor Factory Busted Pudhari
नंदुरबार

Illegal Liquor Nandurbar | बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त; १० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त, एक जण ताब्यात

जुगनी गावाच्या दुगलीबारी पाड्यावर स्पिरीटच्या साहाय्याने बनावट देशी दारू

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar Fake Liquor Factory Busted

नंदुरबार : स्पिरीटचा वापर करून बनावट देशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. यावेळी सुमारे १० लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यातील अवैध दारूनिर्मिती, दारू वाहतूक, अवैध शस्त्रसाठा, अंमली पदार्थांची लागवड व साठवणूक तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील जुगनी गावाच्या दुगलीबारी पाड्यावर एका व्यक्तीकडून स्पिरीटच्या साहाय्याने बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ छापा टाकला असता लक्ष्मण हात्या पाडवी (वय ३१, रा. तलावडी, पोस्ट धनाजे बु., ता. धडगाव, जि. नंदुरबार) हा बनावट दारूनिर्मिती करताना आढळून आला. कारवाईदरम्यान बनावट देशी दारू, स्पिरीट तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये १ लाख ५६ हजार रुपयांचे बनावट देशी दारू ‘टुंगो पंच’चे ३९ बॉक्स, ४५ हजार रुपयांचे १५० लिटर स्पिरीट, १ लाख रुपयांचे बाटल्यांना बुच व पॅकिंग करणारे इलेक्ट्रिक मशीन, १ लाख १६ हजार ५०० रुपयांचे दारूनिर्मितीचे साहित्य तसेच ७ लाख रुपयांची बोलेरो चारचाकी (क्रमांक एमएच ३९ जे ०९४४) यांचा समावेश आहे. एकूण १० लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२३ तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, मुकेश पवार तसेच शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT