Dhadgaon Cannabis Seizure
नंदुरबार : धडगाव तालुक्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईला वेग आला असून, गेंदा गावातील एका शेतातून तब्बल ९३ लाख ६ हजार रुपये किमतीचा १८६ किलो गांजा जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही धडगाव तालुक्यातील सलग तिसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वीच्या दोन कारवायांमध्ये अनुक्रमे एक कोटी आणि २ कोटी २१ लाख रुपयांची गांजाची झाडे जप्त करण्यात आली होती.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची वाहतूक व साठा, अवैध अग्निशस्त्रे तसेच अंमली पदार्थांची लागवड आणि तस्करीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
८ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की, गेंदा गावातील एका शेतात ज्वारीच्या पिकामध्ये गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आली आहे. माहितीची खात्री करून पथकाने संबंधित शेतात छापा टाकला. पाहणीदरम्यान ज्वारीच्या अंतरपिकात गांजाची झाडे आढळून आली.
पोलिसांनी १८६ किलो गांजा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतला. याप्रकरणी निर्मल वनकर पावरा (रा. गेंदा, ता. धडगाव) याच्याविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप व अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.