Fodder file photo
नंदुरबार

Nandurbar Drought | नंदुरबारमधून चाऱ्याची परजिल्हा, राज्याबाहेर वाहतूक-विक्रीस बंदी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar Fodder Transport Ban

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१ (प्रथम कळ)’ दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पर्जन्यमानातील कमतरतेमुळे यंदा वैरणीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात संभाव्य चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर तसेच त्यांच्या जीवितावर परिणाम होऊ नये आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा तसेच राज्याबाहेर वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार ही उपाययोजना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर सर्व प्रकारचा सुका व हिरवा चारा, कडबा, विविध प्रकारची कुट्टी, पेंढा, टीएमआर (टोटल मिक्स्ड रेशन) तसेच इतर पशुखाद्याची वाहतूक आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग अथवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून वगळण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश जारी झाल्याच्या दिनांकापासून पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे.

जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा आणि आगामी काळात चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT