MPSC Paper Leak pudhari
नंदुरबार

MPSC Paper Leak | पेपरफुटी प्रकरणातील ‘त्या’ विद्यार्थिनीला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीएससी अधिकाऱ्याच्या नंदुरबारमधील घराचीही झाडाझडती; आर्थिक व्यवहार व मालमत्ता खरेदीची चौकशी

पुढारी वृत्तसेवा

Drug Inspector Exam Leak

नंदुरबार : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक सहा दिवसांत तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये दाखल झाले आहे. या कारवाईदरम्यान प्रकरणात चर्चेत आलेली विद्यार्थिनी ऋतुजा पाटील हिला तपास पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. यासोबतच एमपीएससीमध्ये कार्यरत अधिकारी गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगाने त्यांच्या नंदुरबार येथील घराचीही तपासणी करण्यात आल्याचे समजते.

या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. तपास पथकाने यापूर्वी दोन वेळा नंदुरबारमध्ये येऊन विविध व्यक्तींची चौकशी तसेच संबंधितांच्या घरांची झाडाझडती घेतली होती. आता पुन्हा पथक दाखल झाल्याने या प्रकरणातील तपासाला वेग आला आहे. दरम्यान, तपासातील बाबींविषयी पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसल्याने ताब्यात घेण्याची नेमकी कारणे अथवा कारवाईचे स्वरूप अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नंदुरबारपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, शिक्षक अमृत पाटील तसेच तक्रारदार विद्यार्थी गौरव पाटील यांची चौकशी करण्यात येत आहे. गौरव पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्यातील वादातून कथित पेपरफुटीचे प्रकरण समोर आल्याची माहिती प्रसारित झाल्यापासून ऋतुजा पाटील या प्रकरणात चर्चेत आली आहे.

एमपीएससी अधिकाऱ्याच्या घराची तपासणी

एमपीएससीमध्ये कार्यरत असलेले गोपाल मराठे यांच्या कथित सहभागाच्या अनुषंगानेही तपास यंत्रणा माहिती संकलित करत असल्याचे समजते. मराठे हे मूळचे नंदुरबारचे रहिवासी असून, पेपरफुटीचा आरोप असलेल्या कौटिल्य अकॅडमीचे ते माजी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या नंदुरबारमधील घराची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, प्रकरणातील संशयितांनी अलीकडच्या काळात नंदुरबारमध्ये केलेले आर्थिक व्यवहार तसेच मालमत्ता खरेदी-विक्रीची माहितीही तपास यंत्रणेच्या रडारवर असल्याचे समजते. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात नंदुरबारला महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळात या तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT